एक एक मधमाशी जगवावया How to get Honey from Honey bee without killing them
shrikant gajbhiye |
'बी दि चेंज'द्वारे शेतकऱ्यांनाही मदतीचा प्रयत्न
राज्यात गेल्या दहा वर्षांत मधाचे उत्पन्न ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. बाजारात जे मध उपलब्ध आहे त्यात साखरेचे प्रमाण वाढते आहे. मधमाश्यांचे अस्तित्व हळुहळू संपुष्टात येत असल्याने, अस्सल मधाचा गोडवा कुठे चाखायला मिळणार! अशा परिस्थितीत निसर्गचक्र जपणारी, परागीकरणासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असणारी मधमाशी जपण्यासाठी २८ वर्षांचा एक तरुण 'बी दि चेंज' या प्रकल्पातून उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय. पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनीही त्याचा हाकेला ओ देऊन मधमाशी जगवण्यासाठी शेत खुले केले आहे. मधमाशी जगवणारा हा तरुण आहे, श्रीकांत गजभिये...
आयआयएममधून एमबीएची पदवी घेतल्यानंतर नागपूरच्या श्रीकांतने कुतूहल म्हणून पुण्यात पाच दिवसांचा मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेतले. मधमाशीचे निसर्गचक्रातील अनन्यसाधारण महत्त्व या कोर्समुळे त्याच्यापुढे खुले झाले. ही मधमाशी संपली तर आंबे, कलिंगड, लिंबू, टरबूज, सिमला मिरची, कारले, जांभळासारखी अनेक फळे आणि साडेतीन हजारांहून अधिक फुलांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येईल, हे त्याच्या लक्षात आले. मधमाश्यांपासून मध गोळा करण्यासाठी मधमाश्यांची पोळी एकतर जाळून टाकली जातात किंवा मधमाशा मारून त्यापासून मध आणि मेण मिळवले जाते. पण हळुवार फुंकर मारून, अत्यंत कौशल्याने साखरी मोहळात राहणाऱ्या मधमाश्यांपासून मध मिळवता येते. या मधमाश्यांना लाकडी घरांमध्ये, बी हाऊसमध्ये राहण्याची सोय करता येते. हे या प्रशिक्षणातून लक्षात आल्यावर श्रीकांतला एकच ध्यास लागला. तो म्हणजे मधमाशी जगवण्याचा, त्याचा लाभ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा. त्यातूनच साकारला गेला 'बी दि चेंज' नावाचा प्रकल्प. पवनी येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालय, प्रा. भुवेंद्र राहिले, पुरुषोत्तम गेदाम यांनी त्यासाठी मोलाची साथ दिली.
No comments:
Post a Comment