Thursday, November 10, 2016

Chimbori recipe in marathi चिंबोरी

पावसाळ्यात चहा आणि भजीची लज्जत काही औरच. पण ‌ही झाली संध्याकाळची पंगत. जेवणाचे ताटही खास पावसाळी पदार्थांनी सजायला हवंच. या मोसमात मत्स्यप्रेमींच्या तोंडाला पाणी आणते ती, चिंबोरी. खास पावसात तब्येतीत ताव मारल्या जाणाऱ्या या चिंबोरीचे प्रकार आणि त्या बनवण्याच्या पद्धतीत खूप विविधता आढळते. चिंबोरी अनेकदा घरीच करणं पसंत केलं जातं. कारण हॉटेलमध्ये अस्सल चवीची चिंबोरी मिळतेच असं नाही. पण चटकदार चिंबोरीचा पर्याय बदलापूर पश्चिमेला साई सागर रेस्टॉरंटमध्ये नक्की सापडेल.

चिंबोरी सूप, गावठी भरलेली चिंबोरी, तंदूर चिंबोरी, आगरी पद्धतीची चिंबोरी, खाडीची चिंबोरी, नदीची चिंबोरी, समुद्राची चिंबोरी... कित्येक प्रकार आणि त्याचे स्वादही. या चवींचा आस्वाद घेऊ तितका थोडा. गांधीनगरमधील बाजारपेठेजवळील साई-सागर गार्डन रेस्टॉरंटमधील या खास चिंबोरी स्पेशल ‌डिशचा आस्वाद तृप्त करतो.

  

चिंबोरी सूप Chimbori Soup

गावठी चिंबोरीच्या छोट्या नांग्या कुस्करून त्यांचा रस तयार केला जातो. त्यात चवीनुसार मीठ, मसाला टाकून हे सूप सर्व्ह केलं जातं. या सुपाचा चमचा तोंडात गेल्यावरच एक बाऊल आणखी घ्यावं, अशी इच्छा होते.

आगरी चिंबोरी (खाडीची) Aagari Chimbori  Khadichi

बदलापुरात आगरी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणे इथेही आगरी पद्धतीच्या चिकन आणि मटनासारख्या पदार्थांची रेलचेल आहे. पण आगरी चिंबोरीची बातच न्यारी... कारण खाडीच्या पाण्यातील ही चिंबोरी आगरी मसाल्याने भरलेली असते. मोठ्या आकाराची असते. आगरी मसाल्याची चव वेगळीच असते. याच चवीतील चिंबोरी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच.

गावठी चिंबोरी
(नदीची) Gavathi Chimbori Nadichi

आगरी समाजाप्रमाणे इथे मुंबई-ठाणे या भागातून आलेले इतर प्रांतातील चिंबोरीप्रेमींना नदीच्या पाण्याची भरलेली काळी गावठी चिंबोरी जास्त आवडतात. कोकणातील चाकरमान्यांसाठी तर चिंबोरी म्हणजे खूप काही. कोकण पट्ट्यात चिंबोरीत गोड्या मसाल्याबरोबर मालवणी तिखट मसाला आणि ओले खोबरं, असं मिश्रण वापरलं जातं. हाच मसाला गावठी चिंबोरीत असतो.

तंदुरी चिंबोरी (खाऱ्या पाण्याची) Tanduri chimbori Kharya panyachi

आतापर्यंत आपण तंदुरीमधील चिकन, मटणाचे प्रकार पाहिले. पण तंदुरी चिंबोरीचा पर्यायही येथे आहे. या ठिकाणी खाऱ्या पाण्यातील, वीतभर लांबीची चिंबोरी तंदुरी मसाला लावून चिकन तंदुरीप्रमाणे भट्टीत भाजली जाते. लालभडक तंदुरी चिंबोरी पाहून वा क्या बात है... असे उद्गार आपसूकच येतात.

इतर मांसाहारी पदार्थ

इतरही मांसाहारी पदार्थ चांगल्या चवीचे आहेत. प्रॉन्झ कुरकुरा, हे त्यातील एक. यामध्ये न सोललेली ही कोळंबी छान तळलेली असते. पुदीन्याच्या चटणीतील कोळंबी म्हणजे फ्रॉन्स मिंट सॉस. यासाठी लागणारी कोळंबी, नदीच्या पाण्यातील आणि तलावतील असतात. याच बरोबर पत्रानी पापलेट. तळलेले पापलेट केळीच्या पानावर सर्व्ह केले जाते. चिकन आणि मटणाचे अनेक पदार्थही इथे मिळतात.

शाकाहारी खवय्यांसाठी

येथे शाकाहारी पदार्थांची चवही छान आहे. शाकाहारीमध्ये स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत सर्व पदार्थ आपल्याला मिळतात. विशेष म्हणजे ग्राहकाने सांगितलेली आगळीवेगळी रेसिपीही येथे बनवून दिली जाते, असे साई-सागर फॅमिली रेस्टॉरंटचे संचालक अरुण चव्हाण यांनी सांगितले.

No comments: