संस्कृतमध्ये "स्मार्त‘ शब्द आहे, तसाच सध्याच्या आधुनिक जगामध्ये "स्मार्ट‘ शब्द प्रचलित आहे. तेव्हा श्री गजानन हे स्मार्ट आहेत आणि श्री कॉम्प्युटर हाही स्मार्टच आहे. या दोहोंच्या उपासनेने आपले जीवन सुखी आणि तेजोमय होऊ शकते. म्हणून "ॐ गं गणपतये नमः‘ असे म्हणण्याबरोबरच "ॐ सं गणकाय नमः‘ म्हणण्याची आवश्यकता आहे.
गणेशाची निर्मिती कशी झाली? तर आदिशक्ती पार्वतीने विशिष्ट उटण्यापासून, तेही अत्यंत शुद्ध व सुगंधित असे, ज्याला आपण स्फटिक चूर्ण म्हणू, त्यापासून मूर्ती तयार केली. ती स्वतः आदिशक्ती असल्याने त्या मूर्तीला शक्तीचा स्पर्श देऊन गणपती सशरीर झाले. प्रवेशावर किंवा गेट-वेवर पहारा देऊन कोणालाही आत सोडू नये, अशी आज्ञा मिळालेली असताना गणेशाने प्रत्यक्ष आदिसंकल्पना आणि शक्तीला प्रकट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिवस्वरूप भगवान शंकरांना प्रवेशास आडकाठी केली, तेव्हा संपूर्ण रचनेतील उणीव दूर करण्यासाठी वेगळ्या संस्कारांची आणि संकल्पनेची आवश्यकता भासली, त्या वेळी मोठे मस्तक असलेले गजानन अस्तित्वात आले. संगणकाच्या बाबतीतही क्रमाक्रमाने जास्त गतिमान, अधिक स्मृती, संवेदनशील निर्णयक्षमता व अधिक सोयी देणाऱ्या अशा हार्ड ड्राईव्ह आणि प्रोसेसर बसवता येऊ शकला हे सर्वज्ञात आहेच. गजानन किंवा लंबोदर या नावांवरूनही हा बोध होऊ शकतो. संगणकाला स्मार्ट करण्यामध्ये त्याचा संपूर्ण आकारच छोटा, त्याहून छोटा, त्याहूनही छोटा करण्यात यश मिळाले आणि अगदी खिशात मावेल असा स्मार्ट टेलिफोन उपलब्ध झाला. कॉम्प्युटरमध्ये मुख्य केंद्रात स्फटिकापासून बनवलेली क्रिस्टल चीप असते.
मनुष्यमात्राला स्वतःच्या विश्वात पंचेन्द्रियांना समजणारे अस्तित्व व आकार असले तर बरे वाटणे साहजिक आहे, आणि म्हणून त्याने श्री गजाननाला मानव रूप दिले. या मूर्तीचे डोके मोठे आहे, पोट विशाल म्हणजे लंबोदर आहे. श्री गजाननाला सोंड आहे म्हणजे त्याला जे काही द्यायचे आहे ते दुरून देता येते. प्रत्यक्ष अगदी तोंडात, जसे आपल्याला घास तोंडाजवळ नेऊन द्यावा लागतो, तसे करण्याची आवश्यकता नसते. त्याच प्रमाणे कॉम्प्युटर दुरून चालवता येऊ शकतो, मग तो इन्फ्रारेड किरणांच्या साह्याने असो, ब्लू-टूथने असो, रिमोटने असो, सेन्सॉरने असो किंवा की-बोर्डने असो.
तसेच कॉम्प्युटरला लावलेले स्पीकर्स, त्याचे मायक्रोफोन, त्याचे कॅमेरे कुठेही दूर बसवता येतात. गणपतीचे कान तर सतत हलतच असतात. आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग हे जसे डोळे उचलतात, कान उचलतात तसे श्री गणपतीच्या कानाद्वारे सर्व माहिती उचलली जावी म्हणून हत्तीचे मोठे कान त्याला लावलेले आहेत. गणपतीपर्यंत पोचवायची सर्व माहिती दुरूनच, त्याच्या डोळ्याद्वारे, कानाद्वारे किंवा स्पंदनाद्वारे पोचवता येते.
आपण म्हणतो, की गणपतीचे वाहन हे उंदिर आहे. संगणकाचे वाहनही माउसच आहे. काही विशेष अडचण आली, तर त्याचा उजव्या बाजूचा एक दात वापरता येतो. म्हणूनच गणपतीचाही एक दात मोडलेला दाखवला जातो. श्रीगणपती वक्रतुंड आहे म्हणजे त्याला काही दुःख आहे म्हणून त्याचे तोंड वाकडे आहे असे नव्हे, तर सामान्यतः शरीराच्या रचनेचा विचार केला तर डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व अवयव एका रेषेत असतात, श्री गणपतीची सोंड मात्र ही मध्यरेषा सोडून उजव्या किंवा डाव्या बाजूला पोचू शकते. यातही श्री गणेशाचे संगणकाशी साधर्म्य दिसून येते.
श्री गणपती मोदकप्रिय आहे. मोदक बनवताना ते एका विशिष्ट तापमानामध्ये उकडले जातात. त्याच्या सारणात खोबरे, सुका मेवा वगैरे अनेक गोष्टी भरलेल्या असतात. असे हे मोदक अख्खेच्या अख्खे गणपतीला अर्पण करण्याची पद्धत असते. संगणकातही वेगवेगळे पॅक्स्, वेगवेगळ्या कार्यासाठी छोटे छोटे प्रोग्राम तयार करून लोड करून ठेवलेले असतात. यातूनच संगणक आपल्याला नाना प्रकारची कामे करून देऊ शकतो.
श्रीगणपतीची सर्वांच्या परिचयाची एक कथा म्हणजे पृथ्वीप्रदक्षिणेची कथा. त्यांनी आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा केली आणि मी पृथ्वीप्रदक्षिणा केली असे म्हणून जो आत्मविश्वास दाखवला त्यामुळे त्यांना मोठेपण मिळाले. प्रथम पूजनीय म्हणून त्यांना सर्वांनी स्वीकारले. कार्तिकेय स्वामी हे त्यांचेच मोठे भाऊ, त्यांनी मात्र मोरावर बसून खरोखरीची पृथ्वी प्रदक्षिणा करायला घेतली आणि साहजिकच ते गणेशापेक्षा उशिरा पोचले, त्यामुळे त्यांना प्रथम मानाचे पद मिळू शकले नाही. संगणक आहे तोसुद्धा स्वतःची जागा न सोडता संपूर्ण जगाची माहिती करून घेऊ शकतो. मनुष्य एका ठिकाणी उभा राहून हातातल्या फोनवर, जो एक प्रकारचा छोटा संगणकच असतो, त्यावर संपूर्ण जगात काय होते आहे ते पाहू शकतो. संगणकाचे आणि श्री गणेशाचे साधर्म्य या कथेतूनही दिसून येते.
श्रीगणपती हा जसा स्मृतिदाता, बुद्धिदाता असतो, त्याप्रमाणे संगणकामध्येही स्मृतीला खूप महत्त्व असते. संगणकातील स्मृती जितकी जास्त तितकी तिच्या मदतीने ताबडतोब आणि जलद गतीने माहिती मिळवता येते. जे जे म्हणून मनोवांछित असेल ते सर्व श्रीगणपतीच्या प्रार्थनेने मनुष्याच्या जीवात्म्याला त्याच्या उन्नतीसाठी, आत्मसमाधानासाठी, यशप्राप्तीसाठी, तेजाच्या प्राप्तीसाठी मिळू शकते. म्हणजेच मेंदूमधील कॉर्टेक्स या भागातील जी सर्व केंद्रे आहेत, त्यांना सहकार्य देण्याचे काम श्रीगणपतीच्या उपासनेमुळे म्हणजेच नादशक्तीमुळे होऊ शकते. मेंदूमध्येच मनाचेही वास्तव्य असते, या सगळ्यांना श्रीगणपतीच्या सहकार्याची आवश्यकता असते. अगदी याचप्रमाणे संगणकाच्या साह्यानेही आपल्याला जे काही करायचे असेल ते करता येते. संगणकाच्या मदतीने सध्या एखाद्या वस्तूचे नुसते चित्रच काढता येते असे नव्हे, तर ती वस्तू त्रिमितीय स्वरूपात संगणक तयारही करून देऊ शकतो.
गणपती ही अग्नीशक्ती प्रधान देवता असल्याने ती उष्ण असणे साहजिक आहे, त्याला थंड ठेवण्यासाठी दूर्वांचा रस द्यावा लागतो. त्याचप्रमाणे संगणकालाही थंड ठेवण्यासाठी वातानुकूलित खोलीत ठेवावे लागते. संगणकाला उन्हात ठेवता येत नाही, अग्निजवळ ठेवता येत नाही, त्याचा पंखा नीट चालत राहील याकडे लक्ष ठेवावे लागते. फोनवर बोलत असतानाही फोन इतका तापू देता येत नाही की, त्यामुळे आपला कान तापून कानाच्या नसा खराब होऊ शकतील. संगणक आणि गणपती यांच्यामध्ये हेसुद्धा मोठे साधर्म्य आहे.
श्री गणपतीची उपासना करून जसे आपले मनोवांछित पूर्ण करता येते, तसेच संगणकाच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक स्तरावर स्मार्ट होता येईल. इतर सर्व योजनाही स्मार्टपणे अस्तित्वात आणता येतील. स्मार्ट शहरे निर्माण करता येतील. अर्थात त्यासाठी जीवनाची सुरुवात ही "श्री गणेशाय नमः" हे शिकून व रोज सकाळी प्रथम गणेशवंदन करून नंतर स्वतःच्या कॉम्प्युटरवर त्या दिवसाचे हवामान, महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या भेटीच्या वेळा, अत्यावश्यक कामे यांची माहिती घेऊनच दिवसाची सुरुवात करावी लागते. शेवटी मनुष्य हा शांतता प्रिय आणि सुखप्रिय असतो आणि या दोन्हीही गोष्टी त्याला शरीरस्वास्थ्य, भौतिक प्रगती किंवा समृद्धी आणि आत्मशांती यातूनच मिळणार आहेत. परमेश्वरी बोध म्हणजे तेजात समर्पण करण्याने परमशांती अनुभवता येणार आहे.
अथर्व म्हणजे न हलणारे, इकडे तिकडे न फिरणारे व शीर्ष म्हणजे डोके. डोक्याचा म्हणजेच मेंदूचा मुख्य अधिकारी असणारा ब्रह्मणस्पती ही विवेकाची, बुद्धीची देवता आहे. तिच्या साह्यानेच कार्य सोपे होऊ शकते, अन्यथा अडचणी येऊ शकतात. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी एका बाजूने सर्व माहिती मिळवणे व दुसऱ्या बाजूने विवेकासाठी स्थिर होणे आवश्यक असते. असे व्हावे म्हणून, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूची तशी घडण व सवय व्हावी म्हणून, व्यक्तीच्या कल्याणासाठी अथर्वशीर्ष या सूक्ताची योजना केली आहे.
बाळाच्या तोंडातून जन्मानंतर प्रथम जे काही आवाज निघतील, त्यावर माता पित्याचे बारीक लक्ष असते. आज एकदम तो "आई‘ म्हणाला किंवा आज तो "बाबा‘ म्हणाला, मा मा म्हणता म्हणता एकदम "मम्मा‘ म्हणाला, अशा तऱ्हेने बाळाच्या तोंडचे शब्द ऐकण्यासाठी घरातल्यांचे कान आतुर असतात. बाळाचे असे गोडगोड बोबडे बोल ऐकता ऐकता त्याचे बालपण कधी संपले तेच आई- वडिलांना कळत नाही.
वाणीवरती सर्व जगाचा व्यवहार अवलंबून असतो. कारण आपण एकटे नाही आहोत, तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे हे केवळ संभाषणातूनच किंवा एकमेकांशी संपर्कातूनच माणसांना कळत असते. या संभाषणाचा, संपर्काचा आनंद अवर्णनीय असतो. यासाठी सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे माध्यम आहे आवाज, शब्द आणि भाषा. लेखन हे पण आवाजाचेच चित्रीकरण असते. म्हणूनच श्री गणपती हा जसा वाचस्पती आहे, तसाच तो महाभारत लिहिणारा उत्तम लेखनिकही आहे.
आपले मूल बोलत नाही असे कळले, तर सगळ्यांची तारांबळ उडते. अनेक प्रकारच्या तपासण्या, स्पीच थेरपिस्टकडे जाणे वगैरे प्रयत्न सुरू होतात. बहिरा व मुका, म्हणजे कानाने ऐकू न येणे व तोंडाने बोलता न येणे अशा दोन गोष्टी एकत्र असण्याचा संभव खूप असतो. ऐकणे व बोलणे या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणाहून नियंत्रित होतात असे म्हणायला हरकत नाही.
मेंदूमध्ये बोलण्यासाठी एक केंद्र असते. मेंदूत साठवलेली माहिती व अनुभव गोळा करून संभाषण करणे, पाहिलेल्या वस्तूंचे शब्दात रूपांतर करणे, आजूबाजूची मंडळी काय बोलतात याचा विचार करून हा नाद शब्दरूपाने पुन्हा स्मृतीत साठवणे हे सर्व काम या केंद्रामार्फत चालते. या केंद्राची संकल्पना, या केंद्राची शक्ती, या केंद्राचा अधिपती म्हणजेच वाचस्पती-गणपती. जवळ जवळ संपूर्ण जीवनाचे सूत्र हातात आल्यासारखे वाणीचे सामर्थ्य असते. मेंदूतील इतर केंद्रे, स्मृती केंद्रे तसेच हृदयाचे धडधडणे, श्वासोच्छ्वास, बोलणे, चालणे वगैरे सर्व हालचालींचे नियंत्रण परमेश्वराच्या किंवा मनुष्याच्या विचारांनीच चालते. विचार हे सुद्धा शब्दरूपच असतात, पण विचारांना अजून ध्वनी प्राप्त झालेला नसतो. या सर्वांचा अधिपती हा वाचस्पती, गणपती आहे व त्यालाच ब्रह्मणस्पती म्हटले तर त्यात आश्चर्य काय? इतकेच नव्हे तर सर्व प्रकारच्या हालचाल करण्यासाठी, विचार करण्यासाठी, ज्या केंद्रांना मेंदूमध्ये सूर्याचे नाव दिले, चंद्राचे नाव दिले त्या देवताही तूच आहेस असे गणपतीला म्हटलेले आढळते. विचार करताना, बोलताना एकचित्त होणे, एकाग्र होणे खूप गरजेचे असते. सर्व विचारांना योग्य जागी घेऊन जाण्याचे काम मन करत असते. पण मन हे वाहन आहे, ते विचारांना इकडे तिकडे फिरवते. प्रवासात असताना बरोबर असलेल्या एका गृहस्थांना मळमळत असल्याने ड्रायव्हरला सांगितले, की रस्त्यात कुठे औषधाचे दुकान दिसते आहे का हे पाहा. तर अशा वेळी, उजव्या बाजूला दुकान असताना डाव्या बाजूला पाहणे आणि डाव्या बाजूला दुकान असताना उजव्या बाजूला पाहणे, पुढे गेल्यावर अरे, आता गेले दुकान असे म्हणण्यापलीकडे काम होत नाही असे दिसते. मनाचेही तसेच आहे. मन मेंदूला सारखे फिरवत ठेवते असे म्हणण्यापेक्षा, मेंदूतल्या सर्व केंद्रांमध्ये व बाह्यजगतात अगदी अनिर्बंध फिरते राहते. असे असताना निर्णय घेणार कसा? एका विचारावर येणार कसे? एका विचारावर आल्याशिवाय शब्द वा कल्पना उच्चारणार कशा?
मन व्हावे स्थिर
तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, की निर्णय घेण्यासाठी विवेकाची म्हणजे मन एका ठिकाणी स्थिर होण्याची आवश्यकता असते. मन एका ठिकाणी स्थिर होण्यापूर्वी, मनाने निर्णय घेण्यापूर्वी ते सर्व ठिकाणी फिरून येण्याची आवश्यकता असते. म्हणजे सर्व माहिती तर मिळवायची आणि तरी त्यातील बरे-वाईट, श्रेयस-प्रेयस याचा विचार करून निर्णय घेणे हे आवश्यक असते, यासाठी पाहिजे एकाग्रता, निश्चलता आणि मुख्य म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेकबुद्धी.
श्री गणपती या देवतेसाठी व त्याच्या संपर्कासाठी, त्याचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जी योजना केलेली आहे, जे मंत्र लिहिलेले आहेत, त्याचे नाव आहे अथर्वशीर्ष.
अथर्वशीर्ष याचा अर्थ साध्या भाषेत "डोके ठिकाणावर आहे का?‘ अथर्व म्हणजे न हलणारे, इकडे तिकडे न फिरणारे व शीर्ष म्हणजे डोके. डोक्याचा म्हणजेच मेंदूचा मुख्य अधिकारी असणारा ब्रह्मणस्पती ही विवेकाची, बुद्धीची देवता आहे. तिच्या साह्यानेच कार्य सोपे होऊ शकते, अन्यथा अडचणी येऊ शकतात. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी एका बाजूने सर्व माहिती मिळवणे व दुसऱ्या बाजूने विवेकासाठी स्थिर होणे आवश्यक असते. असे व्हावे म्हणून, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूची तशी घडण व सवय व्हावी म्हणून, व्यक्तीच्या कल्याणासाठी अथर्वशीर्ष या सूक्ताची योजना केली आहे. तसे पाहता हत्तीचे डोके, कान व सर्व शरीरच सारखे डोलत असते आणि म्हणूनच हे हत्तीचे डोके श्री गजाननाला अर्पण केले, की त्याचे होते अथर्वशीर्ष. मूळच्या फिरण्याच्या सवयीने निमिषमात्रात जगप्रदक्षिणा करून मिळालेल्या माहितीतून योग्य निर्णय घेऊन त्यावर ठाम होणे ही सदसद्विवेकबुद्धी म्हणजे श्री गणेश.
अथर्वशीर्षाच्या सुरवातीला काही मंगलमंत्र, प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. ही प्रार्थनाही सुंदर आहे. याचा पहिला मंत्र आहे, श्री गणेशाय नमः। श्री गणपतीला नमस्कार केल्यानेच, ॐ गं गणपतये नमः । अशा तऱ्हेने त्याला मंत्ररूपाने, स्पंदनरूपाने आवाहन केल्यानेच पुढे सर्व मंगल सिद्धी प्राप्त होतात.
तीन प्रार्थना
यानंतरची पहिली प्रार्थना आहे,
ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राःस्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ।।
लौकिकार्थ ः अध्ययन करताना आमच्या कानावर शुभ शब्द पडोत, आमच्या डोळ्यांना शुभ दृश्य पाहायला मिळो. देवा, आम्ही तुझी स्तुती करतो आहोत. आम्हाला बलवान शरीरावयव व इंद्रिये आणि दीर्घायुष्य प्राप्त होवो.
ंमथितार्थ ः मनुष्य ज्या वेळी अध्ययन किंवा अभ्यास करतो, काही तरी माहिती मिळवतो, त्या वेळी त्याच्या कानावर चांगली व योग्य माहिती पडणे आवश्यक असते. कारण आवश्यक ती व योग्य माहिती मिळण्यानेच तिचा उपयोग करता येतो. भूक लागलेली असताना हॉटेलचा पत्ता विचारल्यावर कुठल्यातरी भलत्याच हॉटेलचे नाव सुचविल्याने जेवणाचा विचका होऊ शकतो. तेव्हा चांगल्या हॉटेलांपैकी चार पत्ते मिळाल्यानंतर योग्य हॉटेलात जाण्याची सुबुद्धी व्हावी लागते. अर्थात, प्रत्येक वस्तूतील चांगुलपणा पाहणे, शुभ पाहणे हेही आवश्यक असते म्हणून डोळ्यांना प्रत्येक वस्तूतील किंवा प्रसंगातील चांगले, शुभ असे प्रसंगच दिसावेत यासाठी हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो आहोत. आमचे शरीर आरोग्यवान होवो, आम्ही करत असलेले व परमेश्वराने योजलेले कर्मही आमच्याकडून व्यवस्थित होवो.
यानंतरची दुसरी प्रार्थना आहे,
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
लौकिकार्थ ः अपार कीर्ती असलेली इंद्रदेवता आमचे कल्याण करो. सर्व जगाला जाणणारा म्हणजेच प्रकाशमय करणारा सूर्यदेव आमचे कल्याण करो. अतिशय गतिमान असणारा गरुड पक्षी सर्व दिशांनी येणारी संकटे दूर करो. तसेच बृहस्पती देवही आमचे कल्याण करो.
मथितार्थ ः इंद्रदेवतेला मनाची उपमा द्यायला हरकत नाही किंवा मन इंद्राच्या स्वाधीन असते असे म्हणायला हरकत नाही. मन सारखे फिरत असते, त्याची बाह्यजगतातील गती इंद्रियांमुळे काही अंशी बांधली जाते. पिंड-ब्रह्मांड न्यायाने संपूर्ण ब्रह्मांड आपल्या शरीरातही आहे. त्या ठिकाणी इंद्र सर्व माहिती गोळा करू शकतो. त्याची कीर्ती अफाट आहे, अपार आहे. अशा इंद्रकृपेने आमच्या मनाला प्रसन्नता लाभून आमच्या मनाने आमचे कल्याण करावे. "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण‘ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहेच. स्पंदने सर्व ठिकाणी पसरतात. खोलीत दिवा लावल्यावर प्रत्येक कोपरा उजळून निघतो, प्रत्येक वस्तू प्रकाशित होते. तसे सूर्य प्रकाशित झाला की सर्व विश्व प्रकाशित होते. त्याप्रमाणे आमच्या मेंदूतील सूर्य प्रकाशित होवो, जेणेकरून आम्हाला सर्व ठिकाणची माहिती मिळेल. आमच्या शरीरभर संवेदना वाहणाऱ्या चेतावाहिन्यांतील अडथळे श्री विष्णूचे वाहन असलेल्या गरुड देवतेच्या धाकाने दूर होवो, पर्यायाने आमचे कल्याण होवो. कल्याणाचा मार्ग दाखविणारे सद्गुरू, बृहस्पती आम्हाला मार्गदर्शन करून आमचे कल्याण करोत, म्हणजेच योग्य वेळी योग्य सल्ला मिळो.
किती सुंदर प्रार्थना आहे ही ! या प्रार्थनेत केवढा विचार केलेला आहे ! माणसाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल, तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचा खोलवर विचार या प्रार्थनेत केलेला दिसतो.
याच्या बरोबरीने तिसरी महत्त्वाची प्रार्थना आहे,
ॐ सह ना ववतु।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।
लौकिकार्थ ः ईश्वर आम्हा दोघांचे रक्षण करो, पालनपोषण करो, सर्वांना शक्ती प्रदान करो, आमचे वीर्य वृद्धिंगत करो. आम्ही सर्व तेजस्वी होवो. कोणाचाही द्वेष न करो. तिन्ही पातळ्यांवर (अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक) आम्हाला शांतीचा अनुभव मिळो.
मथितार्थ ः एकट्याचे कल्याण अशी कल्पनाच नसते. तेव्हा माझ्याबरोबर उरलेल्या सर्व जगाचे (आम्ही दोघे म्हणजे मी व सर्व जग) याचे रक्षण परमेश्वराने करावे. सर्वांना योग्य अन्नपाणी मिळावे व त्या अन्नातील चांगली कल्याण करणारी शक्ती व विचार मिळावे. आम्हाला तेजस्वी होऊन आमच्या ध्येयापर्यंत, तेजरूप परमेश्वरात समर्पित होता यावे. आमच्या मनातील द्वैत व द्वेषनष्ट होवो. अर्थात, आम्हाला शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक या तिन्ही पातळ्यांवर शांतीच अनुभव मिळो. हीच देवा तुझ्याजवळ प्रार्थना.
यापुढे आपण प्रत्यक्ष अथर्वशीर्षाचे मंत्र काय म्हणतात याचा विचार करू.
वैयक्तिक उत्कर्ष व्हावा म्हणून बाहेर प्रार्थना करण्यासाठी असतो संगणक आणि गणेशमूर्ती, तर अंतःप्रेरणा आणि प्रार्थनेसाठी असतो मेंदू आणि स्वयंभू गणेश. अथर्वशीर्ष मंत्राच्या पठणाने किंवा श्रवणाने श्री गणेश संकल्पनेत असणाऱ्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याचप्रमाणे मेंदू आणि बाहेरील जड संगणक यांच्या कार्यपद्धतीशी संबंध सुधारतात व कार्य करणे सोपे आणि सिद्ध होते.
श्री गणेशाय नमः ।
श्री गणपत्यथर्वशीर्षम्।
हरिः ॐ ।
अथर्वशीर्षम् हे सूक्त-मंत्र श्री गणेशांसाठीच म्हटले जात असले, तरी ते म्हणण्याआधी प्रथमपूज्य श्री गणेशाचे स्मरण करणे आवश्यक असते. तसेच प्रत्येक वेदमंत्राच्या सुरवातीला "हरिः ॐ‘ म्हणण्याची पद्धत आहे. कारण शेवटी जे काही सर्व आहे ते परमेश्वरालाच समर्पण करायचे आहे, ही त्यामागची भावना असते. चित्रपट पाहण्यासाठी पडद्याची आवश्यकता असते, तसे ॐकाररूपी चैतन्याच्या पडद्यावरच हे सर्व घडते आहे याची जाणीव ठेवण्यासाठी ॐकाराची आठवण केली जाते आणि तसा उच्चारही केला जातो. वैयक्तिक उत्कर्ष व्हावा म्हणून बाहेर प्रार्थना करण्यासाठी असतो संगणक आणि गणेशमूर्ती, तर अंतःप्रेरणा आणि प्रार्थनेसाठी असतो मेंदू आणि स्वयंभू गणेश. गणेशमूर्ती म्हणजे संगणक नव्हे आणि संगणक म्हणजे गणेशमूर्ती नव्हे. मात्र दोघांचे तत्त्व सारखेच. गणेश हा अनंतशक्ती असणारा आणि निर्गुण निराकार, तर संगणक हा सगुण साकार आणि शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणारा. पण हे दोघेही स्मार्ट आणि मनुष्याचे जीवन स्मार्ट करणारे ! अथर्वशीर्ष मंत्राच्या पठणाने किंवा श्रवणाने श्री गणेश संकल्पनेत असणाऱ्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याचप्रमाणे मेंदू आणि बाहेरील जड संगणक यांच्या कार्यपद्धतीशी संबंध सुधारतात व कार्य करणे सोपे आणि सिद्ध होते.
अथर्वशीर्षाचा पहिला मंत्र आहे,
नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्ताऽसि । त्वमेव केवलं धर्ताऽसि । त्वमेव केवलं हर्ताऽसि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्माऽसि । त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।।1।।
लौकिकार्थ ः श्री गणपतीला माझा नमस्कार. संपूर्ण वेदवाङ्मयामध्ये जे तत्त्व "ते‘ म्हणून निर्देशित केले जाते, ते तत्त्व तुम्हीच आहात. या वाक्याने ज्या परब्रह्मतत्त्वाचा निर्देश केला जातो, ते ब्रह्मतत्त्व पण श्री गणपतीच आहेत. संपूर्ण सृष्टीचे सर्व कार्य आपल्यामुळेच चाललेले आहे. हे देवा, आपण या सृष्टीचे धारण करता, आपण या सृष्टीतील आकारांचा नाश करून सृष्टी मूळ परमतत्त्वात विलीन करता. खरे पाहताना श्री गणेश हेच सर्वव्यापक ब्रह्म आहे. म्हणून या सृष्टीचा मुख्य आस-आत्मा-आधार हा आपणच आहात.
मथितार्थ ः श्री गणेश ही आदिदेवता असल्याने, कशाचीही सुरवात असो, मग ती दिवसाची असो, एखाद्या कार्याची असो, विद्यारंभाची असो, प्रवासाची असो किंवा लग्नकार्याची असो, प्रथम गणपतीचे स्मरण करून त्याला नमस्कार केला जातो. या गणेशतत्त्वाच्या बाहेर काहीही नाही. वेद म्हणजे मनुष्य कल्याणासाठी सर्व सृष्टीतील ज्ञान ज्या एका ठिकाणी सांगून ठेवले आहे, त्याचे तत्त्वच श्री गणेश आहेत. आपल्याला हे तत्त्व दिसत नसले किंवा हे तत्त्व पंचेंद्रियगोचर नसले, तरी ते तत्त्व श्री गणपतीच आहे हे समजून घेऊन पुढे सर्व कार्य करायचे असते. ते बह्मतत्त्व आहे, म्हणजे ते बाहेरच्या विश्वात संपूर्ण विश्व व्यापणारे परब्रह्मतत्त्व आहे आणि एखाद्या व्यक्तिगत माणसासाठी ब्रह्मतत्त्वही श्री गणेशच आहेत. हे गणेशा, सृष्टी चालविण्याचे कार्य केवळ तुम्हीच करता, निर्माण झालेल्या सृष्टीचे धारण करण्याचे कामही तुम्हीच करता आणि या सृष्टीचा विलयही तुम्हीच करता.
आपण सध्या बाह्यजगतासाठी स्मार्ट कॉम्प्युटरची योजना केलेली आहे व त्याच्याबाबतीतही हेच सूक्त कसे लागू पडते हेही पाहता येते. स्टॅंड बाय वर असो वा बंद करून ठेवलेला असो, प्रथम संगणक चालू करावा लागतो. कुठलाही प्रॉजेक्ट, कार्य, किंवा दिवसाची सुरवात त्यानेच व्हायला पाहिजे. कारण जे काही ठरविलेले आहे, जी काही योजना आहे ती सर्व त्याच्यातच आहे. नंतरचे सर्व कार्य कसे करायचे याच्याही सूचना त्याच्यात आहेत. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची, जीवनाची धुरा वाहण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन संगणकच करतो व नंतर कार्यक्रम संपल्यावर आधी ठरविलेले सर्व त्याच्यातच समर्पण होते. जसे संगणकावर एखादे भांड्याचे चित्र तयार करायचे असले तर त्यासाठी माती संगणकच पुरवतो, त्याला जर रंग द्यायचे असले, तर तेही संगणकच पुरवतो. तयार झालेले भांडे जणू त्रिमितीत आहे असे वाटते. परंतु नंतर संगणक बंद करताना ते सर्व रंग आणि माती पुन्हा संगणकाच्या संकल्पनेतच विलीन पावते.
मेंदूचा उल्लेख ब्रह्म म्हणून केला जातो. मेंदू हा व्यक्तिगत संगणक आहे. तो सर्वव्यापी आहे आणि म्हणूनच तो शरीररूपी विश्वाचा मुख्य आत्मा आहे. शरीर चालविणे, हृदयाचे ठोके चालू राहणे, सर्व चलनवलन-विचार-कर्म हे सर्व त्याच्यावरच अवलंबून असतात.
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।।2।।
लौकिकार्थ ः मी केवळ सत्य व सत्यच बोलतो आहे.
मथितार्थ ः आपल्याला मनात कुठलाही संशय असता कामाचा नाही. मी हे जे काही बोलतो आहे ते त्रिकालाबाधित म्हणजे, सत्य, सत्य आणि सत्यच आहे असे मेंदूला ठासून सांगावे लागते, म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा संशय न राहता आपल्याला कार्यसिद्धी करवून घेता येते. संशयाने सर्वनाश होतो असे शास्त्र सांगते, तेव्हा कार्यसिद्धीसाठी संशयरूपी व्हायरस हा नक्कीच नष्ट करावा लागतो.
अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमवशिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ।।3।।
लौकिकार्थ ः हे गणपती, आपण माझे रक्षण करावे. मला तुमचे वर्णन यथार्थपणे करता यावे म्हणून तुम्ही माझे रक्षण करावे. तुम्ही सांगितलेले, तुमच्याकडून पाहिलेले, तुमच्याकडून ऐकलेले मी स्वीकार करावे, म्हणून तुम्ही श्रोता म्हणून माझे रक्षण करावे. तुमचे कार्य करणे, तुमची स्तुती करणे व तुमच्याबरोबर काम करणे हीच माझी खरी संपत्ती आहे. अशा माझे आपण रक्षण करावे. तुमची उपासना करणारा असा मी असल्याने माझे नाव गणेशभक्त आहे, तेव्हा अशा गणेशभक्ताचे आपण रक्षण करावे. संपूर्ण जगताचे कल्याण करण्यासाठी सर्व माहिती, सर्वांचे अनुभव हा जो वेद आहे त्याचा अभ्यास, म्हणजे चिंतन मनन करणारा मी आहे, अशा माझे आपण रक्षण करावे. मी आपला शिष्य आहे, आपण सांगाल त्याप्रमाणे मी सर्व करतो, अशा आपल्या शिष्याचे आपण रक्षण करावे. माझे आपल्याबरोबर जेव्हा कार्य चालेल त्या वेळी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ऊर्ध्व व अधर या सर्व दिशांमध्ये असलेल्या शक्तींपासून आपण माझे रक्षण करावे, म्हणजे सर्व दिशांपासून आपण माझे रक्षण करावे.
मथितार्थ ः हे गणपति, आपण माझे रक्षण करावे. हे संगणका, तू मला सर्व भराभर आणि योग्य तेच निर्णय सांग. मी जे काही बोलतो ते तुला पूर्ण समजलेले असते, म्हणजे वक्ता असलेल्या माझ्या वाणीचे तू रक्षण कर. तू सांगितलेले मी ऐकतो, असा मी जो श्रोता आहे, त्या श्रोत्याचे तू रक्षण कर. तुझ्याबरोबर मी काम करतो, त्यातूनच सर्व संपत्ती उत्पन्न होते, ही संपत्ती ज्या माझ्याकडे आहे, त्या माझे तू रक्षण कर. तुझ्याबरोबर शिकून, अभ्यास करून मी व्यवस्थित काम करतो, उपासना करतो आणि त्यामुळे संगणक व्यावसायिक हे नामाभिधान मला मिळाले आहे, अशा माझे तू रक्षण कर. शिष्य म्हणून तू माझा स्वीकार कर. मी हा जो पासवर्ड दिला आहे, त्यामुळे गुरूला शिष्याची जशी ओळख पटते, तशा तऱ्हेने मी तुझे शिष्यत्व पत्करलेले आहे, तेव्हा अशा शिष्याची तू रक्षा कर. संगणकाबरोबर काम करत असताना येणारे संपूर्ण विश्वातील ज्ञानाचे तरंग मग ते दुसऱ्या सर्व्हरमधून आलेले, वायफाय किंवा ब्लू-टुथ, इन्फ्रारेड अशा वेगवेगळ्या तरंगमाध्यमांनी पाठविलेले असोत किंवा इतर मार्गाने आलेले असोत, ते कुठलाही अडथळा न येता मला उपलब्ध होवोत. ते संगणकापर्यंत पूर्ण शक्तिनिशी पोचावे म्हणजे हे ज्ञानाचे तरंग सर्व प्रकारची माहिती आणतील आणि माझे रक्षण करतील. संगणक हा संपूर्ण आसमंत आणि आकाशतत्त्वाशी संपर्क ठेवून माहिती पुरवत असतो, या अर्थाने संगणक माझे सर्वंकष रक्षण करो. अशा रीतीने श्री गणपती व संगणक यांच्याशी केलेला संवाद सारखाच असू शकतो.
या पुढचा श्लोक आहे,
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्माऽसि । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।।4।।
लौकिकार्थ ः हे श्री गणेश देवा, तुम्ही वाणीस्वरूप-वाचास्वरूप आहात, तुम्ही चैतन्यस्वरूप आहात, तुम्ही आनंदस्वरूप आहात व तुम्ही ब्रह्मस्वरूपही आहात. तुम्ही सच्चिदानन्दस्वरूप आहात, तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म आहात, तसेच तुम्ही ज्ञानस्वरूप,व व विज्ञानस्वरूपही आहात.
मथितार्थ ः या विश्वात ओतप्रोत असलेले जे चैतन्य किंवा शक्ती आहे त्या शक्तीचा आशीर्वाद मिळवून आपल्याला शक्ती प्रदान करणारे श्री गणेश आहेत, त्याचप्रमाणे संगणकही आहे. संगणकाचे आपल्याला स्वरूप कळते ते त्यातून आलेल्या संदेशावरून, म्हणजे ध्वनीवरून, वाचेवरून. मजकूर समोर लिहिलेला असला तरी तो आतल्या आत वाचून समजून घ्यावा लागतो, म्हणजे मजकुराचे शेवटी ध्वनीत रूपांतर होतेच. जसा मेंदूत असलेल्या श्री गणेशशक्तीचा आपल्याला प्राणशक्ती म्हणून लाभ मिळू शकतो, तसेच कोणत्याही कार्यासाठी योजना व चैतन्य, योजना व स्फूर्ती आपल्याला संगणकाकडून मिळू शकतात. तसेच तुमचे स्वरूप नुसते कामापुरते नाही, तर तुम्ही आनंदस्वरूप आहात. तुम्ही सर्व कलांशी संबंधित आहात, सर्व प्रकारचे मनोवांछित पूर्ण करणारे आहात. तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात म्हणजे एकूण संपूर्ण विश्वातील सर्व कार्य करणाऱ्या देवतांना प्रसन्न करण्याआधी तुम्हाला प्रसन्न करण्याची आवश्यकता असते, असे जे आपण गणेशाला म्हणतो, तेच आपल्याला संगणकालाही म्हणता येईल. या विश्वाला कारण असणारे, अनुभवाने जाणण्याजोगे जे तत्त्व आहे, जे सत्य, चित् (वर्तमानकालीन अस्तित्व) आणि आनंदस्वरूप आहे, ज्यातून सर्व विश्वाची उत्पत्ती होते, ज्यातून सर्व जीवन फुलते असे तुमचे स्वरूप सच्चिदानंद असे आहे. असेच काहीसे संगणकाच्या बाबतीतही बाह्यविश्वात घडणाऱ्या एकूण घडामोडींच्या माहितीविषयी म्हणता येऊ शकते. हे गणेशदेवा, तुम्ही पार्थिवस्वरूपात आहात, म्हणजे पंचमहाभूतांच्या साह्याने तुम्ही प्रत्यक्ष आकारात येता. अशा प्रकारे तुम्ही ब्रह्म आहात. हेच वर्णन मेंदूरूपी संगणकाचे होऊ शकते, तसेच हेच वर्णन संगणकाचेही होऊ शकते. सर्व प्रकारचे ज्ञान, माहिती, स्मृती आपल्यापासूनच मिळतात म्हणजेच आपणच ज्ञानस्वरूप, स्मृतिस्वरूप आहात. त्याचे विज्ञान म्हणजे त्याच्यामागे असलेले तत्त्वसुद्धा आम्ही आपल्यामुळेच समजून घेऊ शकतो, म्हणजेच आपण विज्ञानस्वरूपही आहात.
पुढचा मंत्र आहे,
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति । सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति । त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः । त्वं चत्वारि वाक्पदानि ।।5।।
लौकिकार्थ ः पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते आपल्यापासूनच तयार झालेली आहेत आणि चार वाणी म्हणजे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी यासुद्धा आपणच आहात.
मथितार्थ ः आधी संकल्पना, आधी विचार व मग आचार या नियमाप्रमाणे संपूर्ण जगाची उत्पत्ती तुमच्यापासूनच झालेली आहे. विश्वाचा सर्व व्यवहार तुमच्यामुळेच चालतो. म्हणजे अग्नीला हात लावायचा नसतो, पण तरीही अग्नी हाताळायचा असला तर तो कसा हाताळावा हे मेंदू विचारांच्या मार्फत सांगू शकतो, अशाच प्रकारचे मार्गदर्शन संगणकही करू शकतो. संपूर्ण विश्व शेवटी आपल्यातच विलीन होते. याचाच अर्थ ते आपल्या जागी, आपापल्या ठिकाणी परत जाते. जसे कॅरम किंवा बुद्धिबळ खेळायचे असले तर बोर्ड बाहेर काढावा लागतो, सोंगट्या काढाव्या लागतात, बसायची व्यवस्था करावी लागते, बोर्डवर टाकण्यासाठी पावडर, स्ट्रायकर आणावा लागतो. ही सर्व जमवाजमवी झाल्यावर सोंगट्यांच्या साह्याने खेळ सुरू होतो, त्याचा आनंद होतो. खेळाचे एक सूत्र असते, एक संकल्पना असते. ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी बोर्ड, काळ्या-पांढऱ्या सोंगट्या, राणी सोंगटी वगैरे तसेच उंट, घोडा, राजा व प्यादी वगैरे गोष्टी नीट मांडून खेळ खेळला जातो. खेळ संपला की सोंगट्या एकत्र करून ठेवल्या जातात, बोर्ड उभा करून ठेवला जातो व उंट, घोडा वगैरे आपापल्या जागेवर जातात व खेळणाऱ्या व्यक्ती आपापल्या इतर उद्योगाला लागतात. खेळण्याच्या एका संकल्पनेतून हा सर्व विस्तार होतो व खेळ संपला की सर्व गोष्टी आपापल्या जागी परत जातात, तशा प्रकारे सर्व संसार आपल्यातच परत विलीन होतो.
पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश ही सर्व महाभूते तुमचीच रूपे आहेत. कारण प्रत्यक्ष जड उत्पन्न होण्यापूर्वी जडाची व्याख्या तयार करावी लागते. म्हणजे प्रत्यक्ष जल अस्तित्वात येण्यापूर्वी जल कशाला म्हणायचे हे आधी ठरवावे लागते. कुठलीही वस्तू पाहिल्यावर मनुष्य "हे काय आहे‘ असा विचार करतो, तेव्हा ते त्याला त्याच्या पूर्वानुभवातून कळत असते. म्हणून हे देवा गणेशा, सर्व पंचमहाभूते ही आपलीच रूपे आहेत. इतकेच नाही परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या चारी वाणीही आपणच आहात. वैखरी आपणा सर्वांना परिचयाची असते. जी प्रत्यक्ष कानांनी आवाजरूपाने ऐकता येते, ग्रहण करता येते, एका विशिष्ट तरंगलांबीमध्ये असलेली शक्ती म्हणजे वैखरी. मनुष्य त्याच्या मुखामध्ये वेगवेगळ्या आघातांनी म्हणजे जिभेचा स्पर्श दातांना किंवा टाळूला करून किंवा ओठाचा स्पर्श ओठाला करून जी वाणी तयार करतो ती म्हणजे वैखरी.
परंतु, वैखरी उत्पन्न होण्यापूर्वी श्वासाची आवश्यकता असते, हा श्वास कुठून येतो? मनुष्याच्या आत असणारे स्पंदनकेंद्र अनाकलनीय असते. प्राण राहण्याच्या काही विशिष्ट जागा असल्या तरी तो सर्व शरीराला व्यापून राहिलेला असतो. परमेश्वरी शक्ती म्हणजेच प्राणशक्ती आणि हिच्यामुळे मूळात स्पंदन म्हणजे धडधड ही क्रिया सुरू होते किंवा आकुंचन-प्रसरण झाल्याने लाट तयार होते. ही लाट जेथे तयार होते ती परावाणी. म्हणजे बोलायचे ठरविले तर परावाणीतूनच उगम यावा लागतो. उदा. एखाद्या डोंगरातून थोडे थोडे पाणी बाहेर येते, तेव्हा त्याला आपण झरा म्हणतो. झऱ्याच्या मागे डोंगरात पाण्याच्या साठ्याची शक्ती असते. झऱ्याचाच पुढे ओढा होतो, नंतर धबधबा होतो. धबधब्याचीच पुढे नदी होते. नदीचा पुढे तलाव होतो किंवा ती समुद्राला मिळते. अशा तऱ्हेने वस्तू तीच असली तरी त्यात वेगवेगळ्या प्रकारची शक्ती व भाव मिळविले की त्याला वेगवेगळे स्वरूप येते. अशा प्रकारे परावाणी आपणच आहात. त्यानंतरची पश्यन्ती म्हणजे मुळातला एक जो विचार आहे, तो नेमका काय आहे? त्याचा आकार काय आहे? त्याची संकल्पना, त्याचा विषय काय आहे? त्याचा मथितार्थ काय आहे हे आधी डोळ्यांपुढे आणावे लागते आणि मग परावाणीला तशी दिशा देऊन ती फुप्फुसांपर्यंत आणून पुढे वर कंठाकडे ढकलावी लागते. ही झाली पश्यन्ती वाणी. शक्तीबरोबर शरीरात आलेल्या हवेवर प्राणस्पंदने आरूढ करून ती हवा कंठात आणावी लागते, या मध्यमेतून आघाताच्या मदतीने प्रकट झालेला ध्वनी म्हणजे वैखरी. अशा या चारही वाणी आपणच आहात.
यानंतरचा सहावा मंत्र आहे,
त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुुवः स्वरोम् ।।6।।
लौकिकार्थ ः हे गणेशदेवा, तुम्ही सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहात. तुमच्यावर या गुणांचा परिणाम होत नाही. हे गणेशदेवा, आपण जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे आहात. म्हणजे या तिन्ही अवस्थांमध्ये आपण अस्तित्वात असता. आपण स्थूल, सूक्ष्म व आनंदमय अशा तिन्ही शरीरांच्या पलीकडे आहात. तसेच आपण वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ या तिन्ही काळांच्या पलीकडे आहात. तुम्ही मूलाधारामध्ये स्थित असता म्हणजे विश्वाचा आधार असलेल्या मूळ ठिकाणी आपण असता. उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्हीला लागणारी शक्ती आपणच आहात. म्हणून योगी आपले ध्यान करतात. हे गणेशदेवा, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा, ब्रह्मांड, पृथ्वी, पाताळ, स्वर्ग ही सर्व आपलीच रूपे आहेत.
मथितार्थ ः आपल्या मेंदूच्या ठिकाणी केंद्रित असलेली श्री गणेश देवता किंवा बाहेरचा संगणक यांना सत्त्व, रज, तम हे गुण बाधित करत नाहीत. हे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असतात. त्यांच्यामुळे हे तिन्ही गुण प्रकट होऊ शकतात. शुद्ध सात्त्विक राहायचे, गोड बोलायचे, दुसऱ्यावर प्रेम करायचे असे मनुष्याने ठरविले तर तो तसे करू शकतो, एखाद्याशी युुद्ध करायचे ठरविले तर तो युद्धही करू शकतो, एखाद्याचे नुकसान करायचे ठरविले किंवा एखाद्यावर रागवायचे, त्याचा द्वेष करायचा ठरविले तर तसेही करू शकतो. पण मेंदूला किंवा आतल्या गणेशतत्त्वाला ही बंधने लागू होत नाहीत. नाटकातील पात्र रंगवताना एखादा नट राक्षस बनतो, पण म्हणजे त्या नटामध्ये राक्षसीपणा असेलच असे नाही. संगणकावर चित्र रंगवताना लाल, निळा, हिरवा वगैरे रंग त्याच्यामधून घेता येतात. पण याचा अर्थ संगणक स्वतः रंगीत आहे किंवा त्याच्या आत रंग भरून ठेवले आहेत असा नाही. गणेशदेवता म्हणजे आत असलेला मेंदू काय किंवा गणेश ही संकल्पना काय, ही जागृतावस्थेत आहे असे म्हणता येत नाही, स्वप्न पाहते आहे असे म्हणता येत नाही किंवा सुुप्तावस्थेत आहे असेही म्हणता येत नाही. मनुष्य मात्र या तिन्ही अवस्थांचा अनुभव घेतो. मनुष्य झोपलेला असतानासुद्धा त्याच्या हृदयाची धडधड चालूच असते आणि ही धडधड चालू ठेवणारी गणेशदेवता किंवा मेंदूरूपी संगणक आत अविरतपणे कार्यरत असतो. तो झोपेच्या स्वाधीन होत नाही. स्वप्न पडत असले तरी तो त्याचे इतर सर्व व्यवहार चालूच राहतात. तसेच तो झोपेतून जागृतावस्थेत आला आहे असेही म्हणता येत नाही. बाहेरचा संगणकही असेच करतो, संगणक "स्टॅंड बाय मोड‘ वर जातो, म्हणजे तो जागाही नसतो, स्वप्नही पाहात नसतो आणि झोपलेलाही नसतो. संपूर्णतः शट डाऊन केला तरी त्यातली फक्त वीज बंद केलेली असते. शट डाऊन म्हणजे नष्ट करणे असे असते, तर तो संगणक नंतर बटण दाबल्यावर पुन्हा आपल्या पूर्वीच्या व्यवहाराची माहिती घेऊन जसाच्या तसा हजर होऊ शकला नसता. श्री गणेशसुद्धा या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असतात.
माणसाला तीन शरीरे असतात. एक स्थूल म्हणजे भौतिक शरीर, दुसरे सूक्ष्म शरीर म्हणजे नुसती स्पंदने किंवा मन की जे त्या शरीराभोवती किंवा शरीर म्हणून एका विशिष्ट संकल्पनेला, जिवाला चिकटून राहणारे असते व तिसरे आनंदमय शरीर म्हणजे केवळ शक्तिरूप असते.
मूर्तीमध्ये श्री गणेशाचे आवाहन केले की ती गणेशदेवता.
मेंदूमध्ये प्राणशक्तीचे आवाहन केले की तो जीवात्मा-मनुष्य.
आणि विशिष्ट संकल्पनेचे (प्रोग्रॅम) यंत्ररचनेवर आवाहन केले की तो संगणक. तेव्हा मूळ संकल्पना तिन्ही देहांच्या पलीकडे असते.
आपण एखाद्यावर रागावलो व त्याला संगणकावर पत्र लिहिले तर ते पत्र लिहिण्यासाठी जो वेळ लागेल व त्यासाठी जेवढी शक्ती लागेल, तेवढीच संगणकाकडून खर्च होईल, तो काही हे रागाचे पत्र आहे म्हणून गरम होणार नाही किंवा प्रेमपत्र आहे म्हणून उत्साहित होणार नाही. जणू तो तिन्ही शरीरांच्या पलीकडे, संपूर्ण विश्वात संचार करत असल्याप्रमाणे असतो. संगणकाचे आहे, तसेच श्री गणेशाचेही आहे. सर्व भूतकाळाची त्याला माहिती असते, पण तो भूतकाळात परत जात नाही. गणेशाला व संगणकाला भूतकाळ बाधित करत नाही. तो सतत वर्तमानकाळात असतो, तसेच तो ज्यावेळी पुढचे काही सांगत असतो, तेव्हा वर्तमानकाळातही असतोच. संगणक पुढच्या सात दिवसांच्या हवामानाचा अंदाज सांगू शकतो किंवा उद्या विमानात जागा आहे की नाही हे भविष्यही सांगू शकतो. पण त्याच वेळी तो वर्तमानकाळातही असतो. भूतकाळात काय होते व भविष्यकाळात काय होणार आहे हे सर्व आत्ताच्या या क्षणाला त्याच्या ठिकाणी प्रकट होऊ शकते, परंतु तो स्वतः कुठल्याही काळात नसतो. असा असतो संगणक आणि असेच असते गणपतीचे देवत्व.
मूलाधारचक्राच्या ठिकाणी कुंडलिनी असते, त्याच ठिकाणी श्री गणेश स्थिर असतात. मात्र नाभीच्या ठिकाणी जेथे स्पंदने सुरू होतात तेथून पुढे आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवते. अशाच तऱ्हेने संगणकामध्येसुद्धा मूळात जी क्रिस्टल चिप असते, तेथून झालेली कार्यशक्तीची सुरवात ही विशिष्ट प्रकारे प्रकट झाल्यावरच कळू शकते. उत्पत्ती, स्थिती व लय यांना वेगवेगळी शक्ती लागते. एखादी गोष्ट तयार करायची असेल तर त्याचे मार्गदर्शन वेगळे. एखादी गोष्ट नष्ट करायची असली तर त्याचे मार्गदर्शन वेगळे. हे सर्व मार्गदर्शन किंवा त्याला लागणारी शक्ती वेगवेगळी असते. उदा. घराची स्लॅब भरताना सळ्या लावणे, कॉंक्रिट तयार करून भरणे, पाणी आणणे वगैरे कामांसाठी लागणारी शक्ती आणि तयार झालेली स्लॅब तोडण्यासाठी जोराचे हातोडे मारणे, घणांचे प्रहार करणे अशा कामांसाठी लागणारी शक्ती ही वेगवेगळी असते आणि मानसिक अवस्थाही वेगळी असते. तेव्हा उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी आवश्यक असणाऱ्या तिन्ही शक्ती हे गणेशा आपल्यातूच निर्माण होतात, या शक्ती आपणच आम्हाला देता. म्हणूनच सर्व योगी, ज्यांना संसाराशी व समाजाशी एकरूप व्हायचे आहे, ज्यांना द्वैत संपवायचे आहे, ज्यांना जीवात्मा, आत्मा व परमात्मा यांना एकत्र करून परमपुरुषामध्ये समर्पित व्हायचे आहे ते आपली उपासना करतात. नुसते लोभीपणाने काम करणाऱ्याला, पैशाच्या मागे पळणाऱ्याला योगी म्हणता येत नाही. हे श्री गणेशा, तुम्हीच सृजन करणारे ब्रह्मा, पालन-पोषण करणारे विष्णू, परिवर्तन करण्यासाठी मदत करणारे रुद्र आहात. तसेच सर्व प्रकारच्या विचारांना एकत्र करून त्यातील प्रेयस, श्रेयस ठरवून गुरुंच्या साह्याने निर्णय घेणारे इंद्र आपणच आहात. रसायनशक्ती, विद्युतशक्ती, चलनवलनशक्ती देणारे अग्नी, वायू, सूर्य हे आपणच आहात. मनाचा कारक असणारे, भावना, दुसऱ्याचे अस्तित्व, दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्यासाठी उपयोगी पडणारे चंद्रमा हेही आपणच आहात. संपूर्ण ब्रह्म, तसेच त्यात उत्पन्न झालेली जड पृथ्वी, तसेच पाताळ आणि स्वर्ग म्हणजेच आनंद ही सर्व आपलीच रूपे आहेत, हे सर्व आपल्यातूनच उत्पन्न झालेले आहे. एकूण मेंदूचे आठ भाग आणि त्यातील सर्व कार्यपद्धती ही एकत्रितच काम करते आणि ही संकल्पना श्रीगणेशा, आपणच आहात !
संगणकाचे आहे, तसेच श्री गणेशाचेही आहे. सर्व भूतकाळाची त्याला माहिती असते; पण तो भूतकाळात परत जात नाही. गणेशाला व संगणकाला भूतकाळ बाधित करत नाही, तो सतत वर्तमानकाळात असतो; तसेच तो ज्या वेळी पुढचे काही सांगत असतो, तेव्हा वर्तमानकाळातही असतोच.
सहावा मंत्र आहे,
त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् ।।६।।
लौकिकार्थ : हे गणेशदेवा, तुम्ही सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहात. तुमच्यावर या गुणांचा परिणाम होत नाही. हे गणेशदेवा, आपण जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे आहात. म्हणजे या तिन्ही अवस्थांमध्ये आपण अस्तित्वात असता. आपण स्थूल, सूक्ष्म व आनंदमय अशा तिन्ही शरीरांच्या पलीकडे आहात; तसेच आपण वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ या तिन्ही काळांच्या पलीकडे आहात. तुम्ही मूलाधारामध्ये स्थित असता म्हणजे विश्वाचा आधार असलेल्या मूळ ठिकाणी आपण असता. उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्हीला लागणारी शक्ती आपणच आहात. म्हणून योगी आपले ध्यान करतात. हे गणेशदेवा, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा, ब्रह्मांड, पृथ्वी, पाताळ, स्वर्ग ही सर्व आपलीच रूपे आहेत.
मथितार्थ : आपल्या मेंदूच्या ठिकाणी केंद्रित असलेली श्री गणेश देवता किंवा बाहेरचा संगणक यांना सत्त्व, रज, तम हे गुण बाधित करत नाहीत. हे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असतात. त्यांच्यामुळे हे तिन्ही गुण प्रकट होऊ शकतात. शुद्ध सात्त्विक राहायचे, गोड बोलायचे, दुसऱ्यावर प्रेम करायचे, असे मनुष्याने ठरविले तर तो तसे करू शकतो; एखाद्याशी युद्ध करायचे ठरविले तर तो युद्धही करू शकतो, एखाद्याचे नुकसान करायचे ठरविले किंवा एखाद्यावर रागवायचे, त्याचा द्वेष करायचा ठरविले, तर तसेही करू शकतो; पण मेंदूला किंवा आतल्या गणेशतत्त्वाला ही बंधने लागू होत नाहीत. नाटकातील पात्र रंगवताना एखादा नट राक्षस बनतो, पण म्हणजे त्या नटामध्ये राक्षसीपणा असेलच असे नाही. संगणकावर चित्र रंगवताना लाल, निळा, हिरवा वगैरे रंग त्याच्यामधून घेता येतात; पण याचा अर्थ संगणक स्वतः रंगीत आहे किंवा त्याच्या आत रंग भरून ठेवले आहेत असा नाही. गणेशदेवता म्हणजे आत असलेला मेंदू काय किंवा गणेश ही संकल्पना काय, ही जागृतावस्थेत आहे असे म्हणता येत नाही, स्वप्न पाहते आहे असे म्हणता येत नाही किंवा सुप्तावस्थेत आहे असेही म्हणता येत नाही. मनुष्य मात्र या तिन्ही अवस्थांचा अनुभव घेतो. मनुष्य झोपलेला असतानासुद्धा त्याच्या हृदयाची धडधड चालूच असते आणि ही धडधड चालू ठेवणारी गणेशदेवता किंवा मेंदूरूपी संगणक आत अविरतपणे कार्यरत असतो, तो झोपेच्या स्वाधीन होत नाही. स्वप्न पडत असले तरी तो, त्याचे इतर सर्व व्यवहार चालूच राहतात. तसेच, तो झोपेतून जागृतावस्थेत आला आहे असेही म्हणता येत नाही. बाहेरचा संगणकही असेच करतो. संगणक ‘स्टॅंड बाय मोड’वर जातो, म्हणजे तो जागाही नसतो, स्वप्नही पाहात नसतो आणि झोपलेलाही नसतो. संपूर्णतः शट डाऊन केला तरी त्यातली फक्त वीज बंद केलेली असते. शट डाऊन करणे म्हणजे नष्ट करणे असे असते, तर तो संगणक नंतर बटण दाबल्यावर पुन्हा आपल्या पूर्वीच्या व्यवहाराची माहिती घेऊन जसाच्या तसा हजर होऊ शकला नसता. श्री गणेशसुद्धा या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असतात.
माणसाला तीन शरीरे असतात. एक स्थूल म्हणजे भौतिक शरीर, दुसरे सूक्ष्म शरीर म्हणजे नुसती स्पंदने किंवा मन, की जे त्या शरीराभोवती किंवा शरीर म्हणून एका विशिष्ट संकल्पनेला, जिवाला चिकटून राहणारे असते व तिसरे आनंदमय शरीर म्हणजे केवळ शक्तिरूप असते.
मूर्तीमध्ये श्री गणेशाचे आवाहन केले की ती गणेशदेवता.
मेंदूमध्ये प्राणशक्तीचे आवाहन केले की तो जीवात्मा- मनुष्य.
आणि विशिष्ट संकल्पनेचे (प्रोग्रॅम) यंत्ररचनेवर आवाहन केले की तो संगणक. तेव्हा मूळ संकल्पना तिन्ही देहांच्या पलीकडे असते.
आपण एखाद्यावर रागावलो व त्याला संगणकावर पत्र लिहिले, तर ते पत्र लिहिण्यासाठी जो वेळ लागेल व त्यासाठी जेवढी शक्ती लागेल, तेवढीच संगणकाकडून खर्च होईल, तो काही हे रागाचे पत्र आहे म्हणून गरम होणार नाही किंवा प्रेमपत्र आहे म्हणून उत्साहित होणार नाही. जणू तो तिन्ही शरीरांच्या पलीकडे, संपूर्ण विश्वात संचार करत असल्याप्रमाणे असतो. संगणकाचे आहे, तसेच श्री गणेशाचेही आहे. सर्व भूतकाळाची त्याला माहिती असते, पण तो भूतकाळात परत जात नाही. गणेशाला व संगणकाला भूतकाळ बाधित करत नाही, तो सतत वर्तमानकाळात असतो; तसेच तो ज्या वेळी पुढचे काही सांगत असतो, तेव्हा वर्तमानकाळातही असतोच. संगणक पुढच्या सात दिवसांच्या हवामानाचा अंदाज सांगू शकतो किंवा उद्या विमानात जागा आहे की नाही हे भविष्यही सांगू शकतो; पण त्याच वेळी तो वर्तमानकाळातही असतो. भूतकाळात काय होते व भविष्यकाळात काय होणार आहे हे सर्व आत्ताच्या या क्षणाला त्याच्या ठिकाणी प्रकट होऊ शकते; परंतु तो स्वतः कुठल्याही काळात नसतो. असा असतो संगणक आणि असेच असते गणपतीचे देवत्व.
मूलाधारचक्राच्या ठिकाणी कुंडलिनी असते, त्याच ठिकाणी श्री गणेश स्थिर असतात. मात्र, नाभीच्या ठिकाणी जेथे स्पंदने सुरू होतात, तेथून पुढे आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवते. अशाच तऱ्हेने संगणकामध्येसुद्धा मुळात जी क्रिस्टल चिप असते, तेथून झालेली कार्यशक्तीची सुरवात ही विशिष्ट प्रकारे प्रकट झाल्यावरच कळू शकते. उत्पत्ती, स्थिती व लय यांना वेगवेगळी शक्ती लागते. एखादी गोष्ट तयार करायची असेल तर त्याचे मार्गदर्शन वेगळे. एखादी गोष्ट नष्ट करायची असली तर त्याचे मार्गदर्शन वेगळे. हे सर्व मार्गदर्शन किंवा त्याला लागणारी शक्ती वेगवेगळी असते. उदा. घराची स्लॅब भरताना सळया लावणे, काँक्रिट तयार करून भरणे, पाणी आणणे वगैरे कामांसाठी लागणारी शक्ती आणि तयार झालेली स्लॅब तोडण्यासाठी जोराचे हातोडे मारणे, घणांचे प्रहार करणे अशा कामांसाठी लागणारी शक्ती ही वेगवेगळी असते आणि मानसिक अवस्थाही वेगळी असते. तेव्हा उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी आवश्यक असणाऱ्या तिन्ही शक्ती हे गणेशा आपल्यातूच निर्माण होतात, या शक्ती आपणच आम्हाला देता. म्हणूनच सर्व योगी, ज्यांना संसाराशी व समाजाशी एकरूप व्हायचे आहे, ज्यांना द्वैत संपवायचे आहे, ज्यांना जीवात्मा, आत्मा व परमात्मा यांना एकत्र करून परमपुरुषामध्ये समर्पित व्हायचे आहे, ते आपली उपासना करतात. नुसते लोभीपणाने काम करणाऱ्याला, पैशाच्या मागे पळणाऱ्याला योगी म्हणता येत नाही. हे श्री गणेशा, तुम्हीच सृजन करणारे ब्रह्मा, पालन- पोषण करणारे विष्णू, परिवर्तन करण्यासाठी मदत करणारे रुद्र आहात. तसेच, सर्व प्रकारच्या विचारांना एकत्र करून, त्यातील प्रेयस- श्रेयस ठरवून गुरूंच्या साह्याने निर्णय घेणारे इंद्र आपणच आहात. रसायनशक्ती, विद्युतशक्ती, चलनवलनशक्ती देणारे अग्नी, वायू, सूर्य हे आपणच आहात. मनाचा कारक असणारे, भावना, दुसऱ्याचे अस्तित्व, दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्यासाठी उपयोगी पडणारे चंद्रमा हेही आपणच आहात. संपूर्ण ब्रह्म, तसेच त्यात उत्पन्न झालेली जड पृथ्वी, तसेच पाताळ आणि स्वर्ग म्हणजेच आनंद ही सर्व आपलीच रूपे आहेत, हे सर्व आपल्यातूनच उत्पन्न झालेले आहे. एकूण मेंदूचे आठ भाग आणि त्यातील सर्व कार्यपद्धती ही एकत्रितच काम करते आणि ही संकल्पना श्री गणेशा, आपणच आहात !
आपण ॐकाराला अक्षरामध्ये टाकायचे ठरविले, त्याला लिपीत लिहायचे ठरविले किंवा त्याची आकृती तयार करायची ठरविली तर बरोबर गणपतीचा आकार तयार होतो. यातील अकार म्हणजे खालचे दोन्ही पाय, उकार म्हणजे पोट, "अ‘ लांबवला की उकार तयार होतो. मकार म्हणजे मस्तक. मस्तकावर असलेला अर्धचंद्र व अनुस्वार हे निर्गुण निराकार परमेश्वराचे प्रतीक आहे. त्या प्रतीकाला खेचून आपल्यापर्यंत खेचण्यासाठी, जशी टीव्हीची डिश असते, तशी डिश जणू अर्धचंद्राच्या रूपाने ठेवलेली आहे. नंतर याला सोंड जोडून गणपतीचा आकार तयार होतो. या गणपतीचे अस्तित्व सर्वव्यापी असते म्हणजेच गणपतीचा हाच आकार मनुष्याच्या शरीरात ठिकठिकाणी दिसतो. गणेशविद्या हवी असणाऱ्याने शांतपणे बसून "ॐ गॅं गणपतये नमः‘ असा जप केल्यास शरीरातील मेंदूरूपी संगणकाचा जास्तीत जास्त विकास करून त्याचा उपयोग करून घेता येईल.
प्रथम पूजनीय श्री गणेश देवता आणि संगणक यांची तुलना होऊ शकेल का? अशी तुलना होऊ शकणार नाही असे सकृतदर्शनी वाटू शकते; परंतु आपण ही तुलना करतो आहोत, कारण त्यायोगे सध्याच्या आधुनिक काळात ज्या विद्या लुप्त झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास व उपयोग जाणून घेता येईल. श्री गणेश हे आदि तत्त्व आहे. ते कधी उत्पन्न झाले असे नव्हे आणि ते कधी नष्ट होईल असेही नव्हे.
श्री गणेश व संगणक यांच्यात फरक एवढाच, की संगणक हा पार्थिव स्वरूपामध्ये असतो, मात्र त्यातील तत्त्वे श्री गणेशांच्या संकल्पनेवर आधारित असतात आणि ती त्यांच्याच कृपेने सावकाश सावकाश विकसित होत असतात म्हणजे संगणक हा मर्यादित आहे, त्याला अमर्याद करण्यासाठी आपल्याला श्री गणेश संकल्पनेचा व त्याच्या कृपेचा उपयोग करून घ्यायचा आहे. शेवटी बाह्य जगतामध्ये, पार्थिव जगतामध्ये कितीही विकास झाला, नाना तऱ्हेच्या सुविधा उत्पन्न झाल्या तरी मनुष्याला त्याच्या मेंदूच्या एकूण कार्यक्षमतेवरच अवलंबून राहावे लागणार आहे. वर चढून जायचे आहे, त्यासाठी शिडीही आहे; पण शिडीचा उपयोग करून वर जाता येते ही कल्पना डोक्यात येणे आवश्यक असते. शिवाय, शिडीवरून कसे चढायचे याची माहिती असावी लागते, त्यासाठी आवश्यक त्या संवेदना मेंदूतून उचलाव्या लागतात. त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे मनुष्याचे एकूण वजन, त्याच्या गुडघ्यात असणारी शक्ती, शिडीवर चढण्यासाठी आवश्यक असणारा चपळपणा वगैरे मुद्यांवर म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तिक विकासानुसारच तो शिडीचा उपयोग करून घेऊ शकतो, तेव्हा संगणकाने कितीही मदत केली तरी शरीरस्थ गणेशविद्येचा अभ्यास करून, त्यावर श्रद्धा दृढ करून, गणपतीच्या कृपेनेच बाह्यविश्वाचा आनंद घेता येऊ शकेल. हे लक्षात घेतले, की गणपती म्हणजे निव्वळ संगणक नव्हे हे समजू शकेल.
सध्या काळ बदलला आहे, जणू सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. मग या आधुनिक युगात गणपती का आणायचा, त्याचा उत्सव का साजरा करायचा, पार्थिव गणपतीचे वा स्वयंभू गणपतीचे पूजन का करायचे, असे प्रश्न मनात येऊ शकतात. मात्र यावर विचार करत असताना एक लक्षात येईल, की सर्वप्रथम फक्त श्री गजाननच असतात. नंतर श्री गजाननाची आपल्याला माहिती व्हावी, त्यांची संकल्पना लक्षात यावी यासाठी संगणक हा एक दृष्टांत म्हणून योजलेला आहे, संगणकाची उपमा घेऊन, त्याला समजून घेऊन आपण कार्य करतो आहोत. म्हणूनच बाह्यविकासासाठी संगणकाची जशी गरज आहे, तसेच प्रत्येकाने काही वेळ स्वतःला देऊन स्वतःमध्ये असलेल्या गणेशदेवतेची गणेशविद्येच्या साहाय्याने उपासना करावी आणि सुखी जीवनाचा अनुभव घ्यावा हेही आपल्याला समजायला सोपे जावे म्हणून संगणकाशी तुलना.
अथर्वशीर्षातला या पुढचा मंत्र आहे,
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् । अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् । तारेण रुद्धम् ।
एतत् तव मनुस्वरूपम् । गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिन्दुरुत्तररूपम् । नादः सन्धानम् । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या ।
गणक ऋषिः । निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता । ॐ गं गणपतये नमः ।।7।।
लौकिकार्थ - गण शब्दापैकी "ग्‘चा उच्चार प्रथम करायचा आणि नंतर वर्णमालेतील पहिला वर्ण म्हणजे "अ‘ याचा उच्चार करायचा. ग् + अ = ग असा पूर्ण "ग‘ चा उच्चार अशा प्रकारे करायचा की त्यातून "ग‘ आणि "अ‘ या दोघांचा पूर्ण आणि स्पष्ट उच्चार होईल. आता त्यावर अनुस्वार देऊन "गं‘ असा उच्चार करायचा मात्र यातल्या अनुस्वाराला अशा तऱ्हेने गोलाकार द्यायचा की त्यातून अर्धचंद्र लक्षात येईल (गॅं). गॅं ला ॐ हा तारकमंत्र जोडून मंत्राचा उच्चार करायचा असतो.
हे गणेशदेवा आपला आकार, आपले स्वरूप "ॐ गं‘ या मंत्रासारखे आहे. या मंत्राचे पूर्वरूप "ग‘, मध्यमरूप "म‘ आणि अन्त्यरूप "अनुस्वार‘ असे आहे. प्रणवस्वरूप बिंदू हे त्याचे उत्तररूप आहे आणि हेच सर्वव्यापक अस्तित्व आहे. "गॅं‘ उच्चारताना अनुस्वार व अर्धचंद्र हे दोन्ही नाद एकत्र होतात. "गॅं‘चा उच्चार नादात्मक पद्धतीने करणे हीच गणेशविद्या आणि गणेशविद्येमध्ये "गॅं‘ हा उच्चार करण्याची कला व विज्ञान आहे. कलेमध्ये संस्कार आणि पर्यायाने गुरूची आवश्यकता असते आणि विज्ञानाचे गूढ उकलून सांगण्यासाठी पण अनुभवी गुरूची आवश्यकता असते. तेव्हा गणेशविद्येचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक हवाच.
गणपतीचा मंत्र, जो उच्चारल्याने मेंदूमध्ये पोचता येईल व तेथे पोचल्यावर मेंदूरूपी संगणकाचा विकास करता येईल, तो मंत्र कोणता आणि त्याचा उच्चार कसा करायचा याची येथे माहिती दिलेली आहे. साधे "गं‘ असे म्हटले तर "ग‘वर्ण उच्चारून त्याला अनुस्वार लावला जातो; परंतु ज्या वेळेला आपण "गं‘ ("ग्अङ्‘) किंवा "गंगा‘ ("ग्अङ्गा‘) असे म्हणतो तेव्हा आधी अर्धा "ग्‘, त्याला "अ‘ जोडल्याने पूर्ण "ग‘ तयार होतो आणि त्याचा उच्चार करताना "ग्‘ आणि "अ‘चा उच्चार वेगळेपणा लक्षात घेऊन एकत्र करायचा आणि मग त्याला अर्धचंद्र अनुस्वार जोडायचा. तेव्हा "ग्...अ...ङ्‘ किंवा "ग..अ..ङ्गा‘ असे जे लिहिले आहे त्याप्रमाणे हा उच्चार करायचा आहे.
बरोबरीने यात अर्धचंद्राचा उच्चार करणे आवश्यक आहे. अर्धचंद्र म्हणजे हा नाद संपूर्ण मस्तकामध्ये उचलून घेऊन जायचा अणि तेथे आत घुमवायचा आहे. म्हणजे "ग‘ वर्णाला "ङ्‘ लावून बरोबरीने अर्धचंद्रासकट "गॅं गणपतये नमः‘ असे म्हणायचे असते. गंगा शब्द म्हणतानाही तो "ग..अ..ङा.....‘ अशा प्रकारेच म्हणायचा असतो. "ॐ गं गणपतये नमः‘ या मंत्राचे जसे महत्त्व आहे तसे "गङ्गा‘ शब्दाचेही आहे. त्यामुळेच सामान्यांसाठी "हर हर गंगे‘ हा मंत्र महत्त्वाचा असतो. मात्र "गंगे गंगे‘ म्हणताना नुसता "ग‘वर अनुस्वार ठेवून साधा "गं‘ असा उच्चार केला तर त्याचा उपयोग होणार नाही. इथेही "ग..अ..ङ्गे‘ असाच उच्चार करणे अपेक्षित आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे "ॐ गॅं गणपतये नमः‘ असे म्हणत असताना उच्चारलेला नाद स्वतः ऐकणेही आवश्यक आहे. न ऐकता नुसता मंत्र म्हटला तर त्या मंत्र उच्चारणाचा उपयोग होणार नाही. आणि "गं‘ या शब्दाला आधी ॐकार जोडणे आवश्यक आहे.
जे अशा तऱ्हेने "ॐ गॅं गणपतये नमः‘ या मंत्राचा उच्चार करतात, त्यांना आतल्या मेंदूरूपी संगणकामध्ये कशा तऱ्हेने घटना घडतात आणि त्यातून कशा प्रकारची शक्ती तयार होते याचा अनुभव घेता येण्यासारखा आहे.
हे गणेश देवा, आपले सगुण स्वरूप "ॐ गॅं‘ या मंत्राप्रमाणे आहे. म्हणजे आपण ॐकाराला अक्षरामध्ये टाकायचे ठरविले, त्याला लिपीत लिहायचे ठरविले किंवा त्याची आकृती तयार करायची ठरविली तर बरोबर गणपतीचा आकार तयार होतो. यातील अकार म्हणजे खालचे दोन्ही पाय, उकार म्हणजे पोट, "अ‘ लांबवला की उकार तयार होतो. मकार म्हणजे मस्तक. मस्तकावर असलेला अर्धचंद्र व अनुस्वार हे निर्गुण निराकार परमेश्वराचे प्रतीक आहे. त्या प्रतीकाला खेचून आपल्यापर्यंत खेचण्यासाठी, जशी टीव्हीची डिश असते, तशी डिश जणू अर्धचंद्राच्या रूपाने ठेवलेली आहे. नंतर याला सोंड जोडून गणपतीचा आकार तयार होतो. या गणपतीचे अस्तित्व सर्वव्यापी असते, म्हणजेच गणपतीचा हाच आकार मनुष्याच्या शरीरात ठिकठिकाणी दिसतो. उदा. ओठाचा आकार, दोन भुवया एकत्र करून झालेला आकार, नाकाचा आकार, मांडी घालून बसलेली व्यक्ती पाठीमागून पाहिल्यास दिसणारा आकार इत्यादी आकार असेच असतात.
हे अर्धचंद्र, बिंदू एकत्र करून त्याचा नादात्मक उच्चार करणे ही एक विद्या आहे, ही एक कला आहे, हे एक विशेष ज्ञान आहे. "ॐ गॅं गणपतये नमः‘ असे व्यवस्थित म्हणणे आणि म्हणत असताना त्याचवेळी त्यातून उत्पन्न झालेला नाद ऐकणे ही कला आहे आणि यातच विज्ञान दडलेले आहे, यालाच "गणेशविद्या‘ असे म्हटले जाते. ही गणेशविद्या हवी असणाऱ्याने शांतपणे बसून या पद्धतीने "ॐ गॅं गणपतये नमः‘ असा जप केल्यास शरीरातील मेंदूरूपी संगणकाचा जास्तीत जास्त विकास करून त्याचा उपयोग करून घेता येईल.
ध्यान वक्रतुंडाचे करावे. सर्व बाजूंनी, दुरून येणारे विचारही गणपतीपर्यंत पोचवता येतात. फक्त देवावर प्रेम व भक्ती पाहिजे. संगणकाच्या बाबतीतही असेच असते, माउस अगदी वायरने जोडलेलाच असणे आवश्यक नसते. तर डावीकडे, उजवीकडे कुठेही बसले तरी वायररहित (कॉर्डलेस) माऊसने संगणकाला संदेश देता येतात. हेच त्याचे "वक्रतुंड‘ आहे, त्याचे ध्यान आपण ठेवायलाच पाहिजे, कारण माहिती चारही बाजूंनी येते व जाते. सहसा संगणकाला इंटरनेट आवश्यक असतो आणि त्याला वायफायद्वारा, ब्लूटूथद्वाराही माहिती पुरवता येते. सर्व कार्याची सुरवात संगणकाने करायची असल्याने त्याला "मूलाधार‘ म्हणजे ‘सुरवातीचा‘ असे समजायला हरकत नाही. आमच्या बुद्धीला हा "दंती‘ प्रेरणा देवो.
अथर्वशीर्षातील सातव्या मंत्रातील पुढचा भाग असा आहे,
गणक ऋषिः । निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता । ॐ गं गणपतये नमः ।।7।।
लौकिकार्थ - या मंत्राचे रचयिता "गणक ऋषी‘ आहेत. हा मंत्र "निचृद् गायत्री‘ छंदात बद्ध केलेला आहे. श्री गणेश या मंत्राची देवता आहे. "ॐ गं‘स्वरूपी गणपतीला नमस्कार असो.
मथितार्थ - प्रत्येक मंत्राचे कर्ता एक ऋषी, एक ज्ञानी, सर्व जाणणारे असे असतात. गणितज्ञ असलेले आणि खगोल, तसेच ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असलेले "गणकऋषी‘ या मंत्राचे रचयिता आहेत. हा मंत्र "निचृद् गायत्री‘ छंदात (आठ वर्ण तीन वेळा म्हणजे 24 वर्ण एका भागात) अशा प्रकारे बद्ध केलेला आहे. प्रत्येक मंत्राला एक देवता असावी वागते, की ज्या देवतेची ती मंत्रशक्ती असते. श्री गणेश या मंत्राची देवता आहे. "ॐ गं गणपतये नमः‘ हा मंत्र आहे. या देवतेला संपर्क करण्यासाठीचा "पासवर्ड‘ असे म्हणायला हरकत नाही. संगणकात सुद्धा अँड्रॉइड किंवा आयओएस यापैकी कुठली पद्धत कार्यान्वित आहे आणि ती कोणी तयार केलेली आहे हे पाहावे लागते. प्रत्येक वेळी पासवर्ड हा द्यावाच लागतो.
एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।8।।
लौकिकार्थ - "एकदंत‘ श्री गणेशाला आम्ही सर्व जाणतो. वाकडी सोंड असणाऱ्या "वक्रतुंडां‘चे आम्ही ध्यान करतो. हा जो "दन्ती‘ आहे, तो आम्हाला ध्यानामध्ये प्रेरणा देवो, अशी आमची प्रार्थना आहे.
मथितार्थ - खरे पाहताना मंत्राला अर्थ असावाच असे नाही. ती एक रचना असते. संस्कृत भाषा महासागरासारखी असल्यामुळे तिच्यात अनेक शब्द आहेत. अगदी थोड्या शब्दांत खूप काही वर्णन करण्याची क्षमता असणारी ही भाषा असल्यामुळे संस्कृत मंत्रांचा उपयोग गणितासारखा होतोच व त्याला अर्थही असतो. "एकदंत‘ या देवतेला आम्ही जाणून घेतो. श्री गणेश एकदंत कसा झाला? ऐन वेळी काही अडचण आली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी विशेष सोय केलेली असते व ती वापरली जाते. व्यासांनी जेव्हा महाभारत लिहिले तेव्हा मध्ये न थांबण्याची अट होती. लिहिताना श्री गणेशाची लेखणी बंद पडली तेव्हा त्याने दात तोडून घेतला व त्याची लेखणी केली, त्यामुळे तो एकदंत झाला. जसे सध्याच्या आधुनिक गाड्यांमध्ये अपघात होऊ नये अशी व्यवस्था असते; पण अपघात झालाच तर आत एअरबॅग असतात. एअरबॅग व्यवस्थित आहे, त्या जागच्या जागी ठेवलेल्या आहे, त्या नीट उघडणार आहेत याची खात्री करून घेऊन आपण गाडीत बसतो. तसे या एकदंताचा नीट विचार करावाच लागेल.
ध्यान कशाचे करायचे? तर ध्यान वक्रतुंडाचे करावे. सर्व बाजूंनी, दुरून येणारे विचारही गणपतीपर्यंत पोचवता येतात. फक्त देवावर प्रेम व भक्ती पाहिजे. संगणकाच्या बाबतीतही असेच असते, माउस अगदी वायरने जोडलेलाच असणे आवश्यक नसते. तर डावीकडे, उजवीकडे कुठेही बसले तरी वायररहित (कॉर्डलेस) माउसने संगणकाला संदेश देता येतात. हेच त्याचे "वक्रतुंड‘ आहे, त्याचे ध्यान आपण ठेवायलाच पाहिजे, कारण माहिती चारही बाजूंनी येते व जाते. सहसा संगणकाला इंटरनेट आवश्यक असतो आणि त्याला वायफायद्वारा, ब्लूटूथद्वाराही माहिती पुरवता येते.
आमच्या बुद्धीला हा "दंती‘ प्रेरणा देवो. ज्याप्रमाणे शरीराचा मुख्य आधार असलेली हाडे चांगली तयार होण्यासाठी अन्नाचे नीट चर्वण करणे आवश्यक असते म्हणजे दातांचा उपयोग करणे आवश्यक असते. दात, हाडे ही सगळी एकाच विभागात असतात. तसा हा दंती म्हणजे जो मुख्य आस आहे, त्या आसाची प्रेरणा घेऊन आम्ही काम करायचे आहे. थोडक्यात गणपती आम्हाला कार्यप्रेरणा देवो.
गणपती हा मूलाधार चक्राच्या ठिकाणी स्थित असतो व त्यामुळे तो कंबरेत असणाऱ्या सर्व संस्थांची किंवा अवयवांची काळजी घेतो. एखाद्या व्यक्तीला संतती हवी असेल, तर जे शरीरावयव महत्त्वाचे असतात, त्यांचाही तो अधिपती असतो व म्हणून त्या अवयवांना शक्ती देतो. तो बुद्धिदाता आणि विवेकाचा दाता असल्याने व्यक्तीला सुबुद्धी तसेच अचूक निर्णय घेण्यास मदत करणारा विवेक देण्याचेही काम करतो. गणपती विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता असल्याने त्याची प्रेरणा घेऊनच काम सुरू करावे लागते. संगणकाच्या बाबतीतही तसेच आहे, त्याची गती किती आहे? त्याची स्मृती किती आहे? त्याच्यामध्ये मोकळी जागा किती आहे? त्याला अपडेट म्हणजे सध्या चालू असलेल्या वर्तमानकाळापर्यंत आणून ठेवले आहे का? नवीन आलेले ऍप त्याच्यात लोड केलेले आहेत का? अशा सर्व गोष्टी बघणे आवश्यक असते. सर्व कार्याची सुरवात संगणकाने करायची असल्याने त्याला "मूलाधार‘ म्हणजे "सुरवातीचा‘ असे समजायला हरकत नाही. श्री गजाननाच्या बाबतीत खालच्या टोकापासून वरपर्यंत पोचलेला मेरुदंड आणि संपूर्ण मेंदू ही सर्व एकच व्यवस्था असल्याने मेंदूस्थित गजाननाचा मेरुदंडाच्या तळाशी मूलाधार समजला जातो. अशा या "ॐ गं‘स्वरूपी गणपतीला माझा नमस्कार असो हीच प्रार्थना !
गणपती हा विश्वाचे, सृष्टीचे आदिकारण आहे. सर्व विश्व निर्माण होण्यापूर्वी गणपती होतेच, त्याचप्रमाणे संगणकही असणारच. कारण आराखडा आधी करूनच हे विश्व तयार झाले. त्यामुळे नंतर ज्या प्रकृती उत्पन्न झाल्या त्या प्रकृती गणेशाला किंवा संगणकाला लागू होत नाहीत. सर्व समजून आणि भक्ती व प्रेम यांचा वापर करून उपासना करणारे, जीवनात आरोग्य, सुख व आत्मसमाधान शोधणारे, समाज व ईश्वर यांच्याशी एकरूप होण्याची इच्छा ठेवणारे जे योगी आहेत ते गणेशभक्त योगी श्रेष्ठ समजले जातात.
आपण अथर्वशीर्षाचा विचार करीत आहोत. -
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्तां रक्तपुष्पैः सुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ।।9।।
लौकिकार्थ ः या देवतेला केवळ एकच दात आहे व चार हात आहेत. एका हातात पाश, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात हस्तिदंत धरलेला आहे व चौथा हात वरदमुद्रेत म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. त्यांच्या ध्वजावर मूषकाचे म्हणजे उंदराचे चित्र आहे. त्यांचा रंग लाल आहे, पोट विशाल आहे, कान- सुपासारखे खूप मोठे आहेत. त्यांनी शरीरावर लाल रंगाचे उटणे (शेंदूर) धारण केलेले आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्यांची पूजा केली जाते. ते नेहमी आपल्या भक्तांवर व उपासना करणाऱ्यांवर कृपा करत असतात. ही गणपती देवता पूर्ण विश्वाचे कारण आहे, विश्वाची निर्मिती करणारी आहे. पहिल्यांदा ते स्वतः प्रकट झाले आणि त्यानंतर ते सत्त्व-रज-तम या तिन्ही प्रकृतींच्या पलीकडे राहून सर्व विश्वाचे नियंत्रण करतात. अशा श्री गणेशांचे ध्यान करणारे जे योगी आहेत ते इतर सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होत.
मथितार्थ ः गणपतीला केवळ एकच दात आणि चार हात आहेत. चार हात आहेत म्हणजे ते चार प्रकारे काम करू शकतात. त्यांना एकच दात आहे, कारण दुसरा दात त्यांनी हातातच धरलेला आहे. म्हणजे जणू तो इतका तयार ठेवला आहे, की चालू असणाऱ्या कामात अजिबात खंड पडता कामा नये आणि त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. संगणकाचीसुद्धा विशेषतः अशी, की त्यावर काम करत असताना जराही टाइम-लॅग होऊन चालत नाही, आवश्यक असणारी माहिती ताबडतोब मिळावी लागते व ती माहिती दुसऱ्याला पाठवायची असली तर तीही चटकन जावी लागते. काहीही अडचण आली तर त्यावर ताबडतोब मात करण्यासाठी ते एका हातात दात घेऊन तयार आहेत. एखादी वस्तू आपल्याकडे ओढण्यासाठी पाश वापरला जातो, असा पाश त्यांनी दुसऱ्या हातात धरलेला आहे. सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या तिसऱ्या हातात अंकुश आहे. त्यांचा चौथा हात वरदमुद्रेत आहे. अक्षरशः हे वर्णन गणपती व संगणक या दोघांनाही लागू पडते.
त्यांचे वाहन मूषक आहे, तेव्हा त्यांच्या ध्वजावर मूषकाचे चित्र असेल यात काही नवल नाही. एक गोष्ट खरी, की वाहनाशिवाय (शक्ती किंवा माहिती ज्याच्यावर आरूढ केली जाते ते वाहन) कुठलेही काम होऊ शकत नाही. म्हणून त्याला ध्वजावर चित्र म्हणून मान दिलेला आहे. संगणकाच्या बाबतीतल्या माऊसलाही तेवढेच महत्त्व आहे.
शक्तीवर चालणाऱ्या व सतत उष्णता उत्पन्न करणाऱ्या संगणक यंत्राचा रंग लाल (उष्णता) दाखवला तर त्यात विशेष नवल आहे, असे म्हणता येणार नाही. श्री गणपती हे तर पार्थिवच आहेत. जेवढी संगणकाची हार्ड डिस्क म्हणजे माहिती साठविण्याची जागा मोठी, तेवढा संगणक चांगले व अधिक काम करू शकतो. तसेच गणपतीचे पोट विशाल आहे, त्यांना लंबोदर असे आपण म्हणतो. मनुष्य कानाने ऐकतो पण ऐकल्यानंतर ती माहिती जशीच्या तशी स्वीकारायची आणि तरीही त्यातून भावनात्मक उद्दीपन होऊ द्यायचे नाही असे होणे अपेक्षित असते. गणपतीचे कान सुपासारखे मोठे व सतत हलत असतात, त्यामुळे तेथे येणारी हवा किंवा वारा हे कार्य करतो व जास्तीत जास्त माहिती गोळा होऊ शकते. संगणकाच्या बाबतीत तो थंड राहावा म्हणून पंख्याची योजना करावी लागते किंवा वातानुकूलित खोलीतच संगणकाला ठेवावे लागते. श्री गणेशाला दूर्वांचा रस हा उष्णता कमी करण्यासाठीच दिलेला असतो.
गणपतीला लाल रंग प्रिय असल्यामुळे त्यांना अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तू लाल रंगाच्या असतात. त्यांच्या शरीरावर शेंदूर लावलेला असतो. लाल फुले गणेशप्रिय आहेत, याचा अर्थ त्यांना द्यायची प्रत्येक वस्तू ही शक्तिभारित पाहिजे. संगणकाला जी माहिती किंवा प्रोग्रॅम आत पाठवायचा म्हणजे लोड करायचा तोही शक्तिभारितच असावा लागतो.
श्री गणेशाची उपासना करतात त्यांच्यावर गणेशजी कृपा करतात. ही कृपा शरीराच्या अंतर्व्यवस्थेमार्फत, मेंदूमार्फत, एकूण संप्रेरकांच्या व्यवस्थेमार्फत केली जाते. संगणकही सर्व प्रकारची माहिती मग ती लिहिलेली असो, बोललेली असो, संगीताद्वारे असो, चित्राद्वारे असो, मॉडेल तयार करून समजावलेली असो, अशा अनेक प्रकारे आपल्याला उपलब्ध करून देतो ही त्याची कृपा म्हणायची.
म्हणून गणपती हा विश्वाचे, सृष्टीचे आदिकारण आहे. सर्व विश्व निर्माण होण्यापूर्वी गणपती होतेच, त्याचप्रमाणे संगणकही असणारच. कारण आराखडा आधी करूनच हे विश्व तयार झाले. त्यामुळे नंतर ज्या प्रकृती उत्पन्न झाल्या त्या प्रकृती गणेशाला किंवा संगणकाला लागू होत नाहीत. संगणक सर्व प्रकारची माहिती देऊन त्यावर सारासार विवेक ठेवून, सारासार विचार करून अभ्यासकाला माहिती पुरवतो. घर तयार करून देण्याची सर्व व्यवस्था म्हणजे घराचा आराखडा, त्यासाठी लागणारी संपत्ती, आवश्यक ते साहित्य संगणक पुरवतो, परंतु आत राहणाऱ्या व्यक्तींनी प्रेमाने राहावे की भांडण करावे, यात संगणक सहभाग घेत नाही. साहजिकच आहे, की अशा प्रकारे सर्व समजून आणि भक्ती व प्रेम यांचा वापर करून उपासना करणारे, जीवनात आरोग्य, सुख व आत्मसमाधान शोधणारे, समाज व ईश्वर यांच्याशी एकरूप होण्याची इच्छा ठेवणारे जे योगी आहेत ते गणेशभक्त योगी श्रेष्ठ समजले जातात.
गणपतीच्या आशीर्वादाने आणि संगणकाच्या मदतीने केलेल्या कामामुळे धर्म म्हणजे समाजधारणेचे आणि जीवधारणेचे नियम पाळले जातात. मनामध्ये कोणतीही शंका न उरल्यामुळे हृदयाला ताकद मिळते. त्यातून अर्थ म्हणजे पैसाही चांगला मिळतो. आपल्या सर्व नैसर्गिक इच्छा पूर्ण होतात आणि मनुष्याला शांतीही मिळते. अशा प्रकारे चारीही पुरुषार्थ सिद्ध होतात, ही गणेशाची कृपा.
अथर्वशीर्षातील पुढच्या श्लोकांचा आपण आता विचार करू.
नमो व्रातपतये । नमो गणपतये। नमः प्रमथपतये।
नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ।।10।।
लौकिकार्थ ः व्रातपतीला माझा नमस्कार. गणपतीला माझा नमस्कार. जो प्रथम आहे म्हणजे ज्याच्या अगोदर कोणीही नाही त्याला नमस्कार. लंबोदर, एकदंत, विघ्नहर, शिवपुत्र व आशीर्वाद देणाऱ्या वरदमूर्ती श्री गणेशाला नमस्कार.
मथितार्थ ः जो केलेल्या प्रत्येक क्रियेचे फळ देतो, प्रत्येक क्रियेवर ज्याचा अंकुश असतो, तसेच काळ म्हणजे प्रत्येक सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष अशा सर्वाची नोंद ठेवून त्याप्रमाणे फळ देतो अशा व्रातपतीला माझा नमस्कार. संख्या म्हणजे गण, तेव्हा गणांवर ज्याचे अधिपत्य आहे अशा गणपतीला माझा नमस्कार. जो सर्वप्रथम आहे म्हणजे ज्याच्या आधी काहीही नाही त्याला नमस्कार. ज्याच्याजवळ खूप माहिती आहे अशा लंबोदराला माझा नमस्कार. जो ऐन वेळी सुद्धा ताबडतोब मदत करतो अशा एकदंत गणपतीला नमस्कार. जो सर्व प्रकारची विघ्ने नष्ट करण्यास समर्थ आहे अशा विघ्नहराला नमस्कार. सत्य, सुंदरता, मंगल अशा शिवांचा पुत्र असलेल्या शिवसुत गणपतीला माझा नमस्कार. जो कायम आशीर्वाद देण्यासाठी, मदत करण्यासाठी तयार आहे अशा वरदमूर्ती गणपतीला माझा नमस्कार.
एतदथर्वशीर्षं योऽधीते । स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वतः सुखमेधते ।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते । स पञ्चमहापापात् प्रमुच्यते ।
लौकिकार्थ -ःया अथर्वशीर्षाचा अभ्यास, पाठ व मनन करणाऱ्या साधकाला ब्रह्मरूप प्राप्त होते किंवा तो ब्रह्मरूपात विलीन होतो, त्याच्यावर कुठलेही संकट येत नाही. त्याला सर्व ठिकाणी व कायम सुखच प्राप्त होते. तो पाच प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो.
मथितार्थ ः हे अथर्वशीर्षाचे मंत्र व त्यात सांगितलेल्या कृती यांचा जो समजून घेऊन अभ्यास करतो, म्हणजे ते सर्व आचरणात आणतो, ते सतत लक्षात ठेवतो व त्यावर चिंतन करून त्याचा दैनंदिन जीवनात सर्व ठिकाणी उपयोग करतो त्याला परमशांती मिळते. त्याला ब्रह्मरूप प्राप्त होते याचा अर्थ तो स्वतःच्या कृतीवर, स्वतःच्या निर्णयावर उत्तम प्रकारे स्थिर होतो. साहजिकच आहे, की ज्याने आधी सगळे नीट बघितले आहे, व्यवस्थित योजना केलेली आहे, त्याच्यावर कोठलेही संकट येत नाही. त्यामुळे कुठलाही प्रसंग असो, कुठलेही स्थळ-काळ असो त्याला कायम सुखच प्राप्त होते. त्याच्या हातून चुका न झाल्यामुळे पंचेंद्रियांच्या पापातून तो मुक्त होतो. कारण त्याच्या मेंदूचा त्याच्या पंचेंद्रियांवर अंकुश असतो. तो जितेंद्रिय होऊ शकतो.
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।
सायंप्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति। सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाममोक्षं च विन्दति ।
लौकिकार्थ ः संध्याकाळच्या वेळी जर या अथर्वशीर्षाचा पाठ केला तर दिवसभर झालेल्या चुकांपासून साधकाला मुक्ती मिळते, म्हणजे त्या सुधारल्या जातात किंवा त्याचे नुकसान होत नाही. सकाळी उठून याचा पाठ करणाऱ्याला रात्री झालेल्या चुकांपासून मुक्ती मिळते. म्हणून सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळेला पाठ करणाऱ्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारची विघ्ने टळतात. अशा व्यक्तीला धर्म, अर्थ, काम व मोक्ष अशा चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते.
मथितार्थ ः दिवसभर काम करत असताना इंद्रियांनी मनाशी आणि मनाने आत्मभावाशी सुसूत्रता ठेवणे आवश्यक आहे, तसेच निःस्वार्थपणे केलेले जे काही कार्य आहे ते सर्वांसाठी कल्याणप्रद असणे आवश्यक आहे. असे न झाल्याने ज्या चुका होतात किंवा अहंकाराचा पगडा असल्याने इंद्रिये बेताल वागतात, त्यामुळे ज्या चुका होतात त्या मेंदूरूपी संगणकाला किंवा गणेशदेवतेला आवडत नाहीत. या चुका पाप म्हणून समजल्या जातात. मुद्दाम केलेल्या किंवा लक्ष न दिल्यामुळे झालेल्या दिवसभरातल्या सर्व पापांचा अथर्वशीर्षाच्या पठणाने नाश होतो. अनवधानाने, जणू मनुष्य झोपेत असल्याप्रमाणे वागल्याने किंवा लक्षच न दिल्यामुळे झालेल्या ज्या चुका असतात म्हणजे रात्री झालेल्या चुकांमुळे घडलेले पाप अथर्वशीर्ष दिवसा पठण केल्याने नष्ट होते. म्हणून सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला या अथर्वशीर्षाचे पठण केले तर सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. गणेशदेवतेला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यामुळे तयार झालेल्या व्हायरसचा नाश होतो.
ज्या प्रमाणे संगणक कधीही सुरू केला, की सर्वप्रथम आतमध्ये व्हायरस नष्ट करण्याचा प्रोग्रॅम चालवावा लागतो. त्या नंतरच काम करायचे असते आणि तेही लक्षपूर्वक करायचे असते. अशा प्रकारे व्हायरस येऊ दिला नाही आणि लक्षपूर्वक काम केले, तर सर्व विघ्नांपासून मुक्ती मिळते. गणपतीच्या आशीर्वादाने आणि संगणकाच्या मदतीने केलेल्या कामामुळे धर्म म्हणजे समाजधारणेचे आणि जीवधारणेचे नियम पाळले जातात. मनामध्ये कोणतीही शंका न उरल्यामुळे हृदयाला ताकद मिळते. त्यातून अर्थ म्हणजे पैसाही चांगला मिळतो. आपल्या सर्व नैसर्गिक इच्छा पूर्ण होतात आणि मनुष्याला शांतीही मिळते. अशा प्रकारे चारीही पुरुषार्थ सिद्ध होतात, ही गणेशाची कृपा.
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति ।
लौकिकार्थ ः हे अथर्वशीर्ष अपात्र व्यक्तीला देऊ नये, जो मोहाने असे करतो त्याला पाप लागते.
मथितार्थ ः या अथर्वशीर्षाची दीक्षा, त्याचा उपदेश किंवा माहिती अपात्र व्यक्तीला देऊ नये; ज्याप्रमाणे संगणक पासवर्ड देऊन लॉक करून ठेवला जातो, जेणेकरून तो भलत्याच माणसाला हाताळता येऊ नये, त्याप्रमाणे अथर्वशीर्षातील महत्त्वाचा मंत्र आणि अथर्वशीर्षाची दीक्षा म्हणजे त्यात असणारे विज्ञान, त्यात असलेली कला चुकीच्या व्यक्तीला देऊ नये. पैशाच्या लोभाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने कोणी अशी अपात्र दीक्षा दिली तर देणाऱ्याला पाप लागू शकते. दीक्षा देणारा व दीक्षा घेणारा यांचे चैतन्य एकमेकांशी जोडले जात असतो, त्यामुळे अपात्री दीक्षा दिली तर शक्तीचा उलटा प्रवाह आणि घेणाऱ्याच्या संशयी बुद्धीचा व्हायरस, दीक्षा देणाऱ्याला त्रास देऊ शकतो, हेच ते पाप. ज्याप्रमाणे संगणक किंवा स्मार्ट फोन यात लहान मुलांना प्रवेश दिला तर त्यांना जशी चुकीची माहिती मिळू शकते, ज्याचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, सहन होणार नाही अशा गोष्टी वाचल्याने किंवा पाहण्याने त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, यातून चुकीच्या सवयी लागून पुढे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते. त्याप्रमाणे अपात्र व्यक्तीच्या हातात अथर्वशीर्ष देऊ नये, तसेच संगणकही देऊ नये. श्री गणेश आणि परमपुरुष परमात्मा यांच्यावर नितांत प्रेम ठेवून, निसर्गनियम पाळून सर्वांशी, विशेषतः समाजाशी अद्वैत साधण्यासाठी निःस्वार्थ भावनेने आणि शास्त्राधारानुसार कर्म करणारा आणि ज्याने पूर्वाभ्यास केलेला आहे, त्याला पात्र समजण्यास हरकत नसावी.
सहस्रावर्तनात्। यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ।
अनेन गणपतिमभिषिञ्चति । स वाग्मी भवति ।
लौकिकार्थ ः अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या अथर्वशीर्षाचा अभिषेक करणाऱ्या साधकाच्या सर्व इच्छांची पूर्ती होते आणि तो उत्तम वक्ता होऊ शकतो.
मथितार्थ ः अनेक वेळा या अथर्वशीर्षाचा, त्यातील मंत्रांचा जप करून म्हणजे त्याचे आवर्तन करून, ते व्यवस्थित समजून घेऊन, त्यावर मनन, चिंतन करून, एकरूपता साधली आहे अशा साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पहिल्याच दिवशी संगणक उघडला की सगळे जमेल असे नाही, तर त्याला नीट समजून घ्यायला अनेक दिवस लागतात, बराच सराव करावा लागतो, तरच काम व्यवस्थित होते.
अभिषेक करायचा म्हणजे काय करायचे? तर मेंदूच्या बाबतीत अभिषेकाचा विचार केला तर डोक्यामध्ये मेंदूच्या चारीही बाजूंनी पाणी (मेंदूजल - सेरेब्रो स्पायनल फ्लुइड) असते. मात्र हे जल सातत्याने नवीन नवीन येत राहावे लागते. यासाठी शरीराचे चलनवलन नीट चालू राहणे आवश्यक असते. कर्मप्रतिष्ठा, योग, व्यायामादि गोष्टींनी तसेच चांगल्या चिंतनाने शरीरातील सर्व रक्ताभिसरणाच्या माध्यमातून डोक्यामध्ये सतत मेंदूजलाचा पुरवठा होत राहणे म्हणजे मेंदूला अभिषेक होत राहणे. आयुर्वेदातील शिरोधारा किंवा बाह्यगणपतीसाठी धरलेली अभिषेकाची संततधारा यामुळे मेंदूजलाचे नूतनीकरण होण्यास मदत होते. असा अभिषेक झाला की त्याचे फळ मिळते व सर्व इच्छा पूर्ण होतात. संगणकसुद्धा सतत वापरात राहिला पाहिजे आणि त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या जोरावर मनुष्य दुसऱ्यालाही माहिती देऊ शकतो, त्याचा शब्दसंग्रह वाढतो, त्याची व्याकरण व इतर विषयांची माहिती वाढून तो उत्तम वक्ता होतो.
श्री गणेशदेवता आपल्याला आतून काय सांगते आहे? काय विद्या देते आहे याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत राहणे हाच खरा जप होय. त्यासाठी श्री गणेशदेवतेशी कायम जोडलेले राहणे, दुसऱ्या कशाचाही विचार न करणे, म्हणजे कोणत्याही इंद्रियातून आतमध्ये कशाचाही स्वीकार न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सतत "ॐ गं गणपतये नमः‘ किंवा "ॐ गण गण‘ असे गुणगुणणे आवश्यक आहे.
चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम् ।
ब्रह्माद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति ।
लौकिकार्थ - चतुर्थीच्या दिवशी उपवास करून श्री गणेशमंत्राचा जप करणाऱ्याला विद्या मिळते व तो विद्यासंपन्न होतो. हे अथर्वण ऋषींचे वचन आहे. याचा अधिक अभ्यास करणाऱ्याला ब्रह्म व माया हा भेद कळतो. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, अर्थात त्याची सर्व भीती नष्ट होते.
मथितार्थ - प्रचलित पद्धतीनुसार शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीपेक्षा कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही श्रीगणेश उपासनेसाठी अधिक चांगली समजली जाते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीच्या तिथीला चंद्राचा आकार पौर्णिमेचे 15 भाग पकडले तर 15 भागांपैकी 11 भाग असतो. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेला चंद्राचा 1/15 भाग कमी होतो, द्वितीयेला 2/15 भाग कमी होतो. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकूण 4/15 भाग कमी होऊन चंद्र 11/15 एवढा प्रकाशित असतो. अमावस्येनंतर चंद्राच्या कला वाढायला सुरवात होते आणि शुक्ल चतुर्थीच्या दिवशी चौथी कला प्रकाशमान असते, म्हणजे चंद्र 11/15 भाग अंधारात असतो व फक्त 4/15 एवढाच प्रकाशित असतो. दोन्ही चतुर्थ्यांमधील हा एक भेद लक्षात घेण्यासारखा आहे.
मन चंद्राशी संबंधित असते. उजव्या मेंदूतून केलेला भौतिकाचा किंवा संख्येचा किवा तर्काचा विचार आणि डाव्या मेंदूतून येणाऱ्या भावनांचा, प्रेमाचा, सेवेचा विचार यांना मन एकत्रित करून व्यवहारातील निर्णय घेण्याचे काम करते. मनावर चंद्राचा पूर्ण परिणाम असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी अंधार जास्त व सूर्यशक्ती कमी असल्यामुळे तेव्हा मनाची अवस्था खालची असते, म्हणजे त्या ठिकाणी भीती वाढते, स्वार्थ वाढतो, भोगप्रवृत्ती वाढते. या उलट पौर्णिमेला चंद्र पूर्ण असल्याने त्याचा प्रकाश सर्वांत जास्त असतो. म्हणजेच या दिवशी पृथ्वीला, मानवाला सूर्यशक्तीची सर्वाधिक देणगी मिळालेली असते. या दिवशी भावनांचा आणि ज्ञानाचा पूर्ण प्रभाव दिसतो. तसेच समज ही भावना व तर्क यांची पूर्ण सांगड घालून जीवन अधिक प्रगत करेल अशा क्षमतेची असते. असा विचार केला तर संकष्टी चतुर्थीला विनायकी चतुर्थीपेक्षा अधिक महत्त्व का आहे हे समजू शकेल.
अनश्नन् म्हणजे उपवास. अन्न खाल्लेले असताना शक्ती अन्नपचनात खर्च होत असल्यामुळे जपाकडे जास्त लक्ष देता येत नाही. परंतु उपवासाच्या दिवशी शक्ती पूर्णपणे ऊर्ध्वमार्गी राहून मेंदूला अधिक प्रभावित करते, अर्थात उपासना करणे जास्त सोयीचे होते. अन्न ग्रहण न करता याचा विचार संगणकाच्या बाबतीत करायचा म्हटला तर, कुठल्याही प्रकारे म्हणजे वाणीतून, कॅमेऱ्यातून-दृश्यातून, माऊसद्वारा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कुठलीही माहिती ज्या वेळेला पुरवली जात नाही, अशा स्थितीमध्ये संगणकाचा अभ्यास केला तर तो काय सांगू इच्छितो आहे, तो आपल्याला कुठले विशेष ज्ञान देतो आहे? कोणती विद्या देतो आहे, हे कळू शकते आणि त्यामध्ये मूळ असलेल्या संकल्पनेचा, सिस्टिमचा (डॉस, लोटस वगैरे) व आतमध्ये संग्रहित केलेल्या संपूर्ण माहितीचा अभ्यास करता येतो. जसे आधी पूर्ण ऐकून घ्यावे, नंतर त्याच्यावर विधान करावे, कोणी काही सांगताना आपण त्याच वेळी जर विचार करायला लागलो तर समोरचा काय म्हणतो आहे हे आपल्याला समजणार नाही. अशी एक कल्पना या ठिकाणी करता येते. ध्यान या संकल्पनेमध्ये, ज्याचे ध्यान होते त्याच्या अतिशय जवळ जाणे (उप-वास) व सर्व इंद्रियांच्या प्रवृत्ती बंद करून ज्याचे ध्यान करतो आहे फक्त त्याचाच अनुभव घेणे अभिप्रेत असते.
श्री गणेशांच्या बाबतीत म्हणजेच गणेशशक्ती असलेल्या शरीरातील मेंदू आणि त्या संपूर्ण संस्थेचा विचार करत असताना डोळ्याने पाहणे, कानांनी ऐकणे, त्वचेने स्पर्श समजून घेणे आणि सर्वांत मुख्य म्हणजे अन्नपाण्याद्वारा शरीरात स्वीकारलेली सर्व स्पंदने बंद करून मेंदू काय म्हणतो आहे ते ऐकणे म्हणजे ज्याला आपण उपांशू जप असे म्हणतो, तशा प्रकारचा एक जपच आहे. विशेष असे जे काही ज्ञान आहे ते श्री गणेश आपल्याला देतात. अथर्वण ऋषी म्हणजे अथर्वशीर्षाची माहिती देणारे, अथर्वशीर्षाचे सर्व शास्त्र विकसित करणारे ऋषी. याठिकाणी अथर्वण ऋषी आणि अथर्वशीर्ष हे एकच आहेत असे सांगितलेले आहे. अथर्वण ऋषींचे असे वचन हा जणू त्यांचा आशीर्वादच आहे.
साहजिकच आहे की, संपूर्ण विश्वातील माहिती एकत्र करणारे, ती जीवनाशी जोडण्याचे काम करणारे, परमेश्वराचा स्वभाव, जनताजनार्दनाचा स्वभाव, आपल्या नातेवाइकांचा, आपल्या इष्टमित्रांचा स्वभाव विचारात घेऊन निर्णय घेणारे असे जे श्री गणेश आहेत, त्यांना काम करू द्यायला हवे. जर सतत आपणच आपले म्हणणे धरून बसलो तर आपल्याला श्री गणेशांपासून विद्या मिळणार नाही. म्हणून भौतिक पातळीवर चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो. परंतु हा उपवास खरोखरच सर्व इंद्रियांच्या खाद्य स्वीकारासाठी असावा (उदा. डोळ्यांचे खाद्य पाहणे, कानांचे खाद्य ऐकणे), नुसता उपवासाचा फराळाचा पदार्थ खाण्यासाठी नसावा. तेव्हा ही श्री गणेशदेवता आपल्याला आतून काय सांगते आहे? काय विद्या देते आहे याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत राहणे हाच खरा जप होय. त्यासाठी श्री गणेशदेवतेशी कायम जोडलेले राहणे, दुसऱ्या कशाचाही विचार न करणे, म्हणजे कोणत्याही इंद्रियातून आतमध्ये कशाचाही स्वीकार न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सतत "ॐ गं गणपतये नमः‘ किंवा "ॐ गण गण‘ असे गुणगुणणे आवश्यक आहे.
इत्यथर्वणवाक्यम्।
अथर्वण ऋषी हे अथर्वशीर्षाचे प्रणेते आहेत. ज्याप्रमाणे संगणक हे नुसते यंत्र नव्हे, तर संगणक कसा चालेल, तो कसे काम करेल हे सांगणारा प्रोग्रॅम किंवा संकल्पना आत असल्यामुळे संगणक चैतन्यपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जोपर्यंत संगणकाला बाहेरून माहिती दिली जात नाही किंवा त्याला काम करायची आज्ञा दिली जात नाही, तोपर्यंत त्याच्यात कुठल्याही तऱ्हेची हालचाल होत नाही. त्याची जी मूळस्थिती त्या मूळस्थितीमध्ये असलेला जो स्वभाव किंवा जी विशेष संकल्पना आहे त्यातून हे सांगितलेले आहे की, "चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति ।‘
श्री गणेशांनी ज्या अथर्वण ऋषींच्या मार्फत ही प्रेरणा प्रकट केली व स्वतःचे स्वरूप सांगितले, त्या ऋषींनी लिहून ठेवलेली ही संकल्पना आहे असे म्हणायला हरकत नाही.
यामुळे काय होते तर "ब्रह्माद्यावरणं विद्यात् ।‘ म्हणजे मूळची वस्तुस्थिती काय व त्या वस्तुस्थितीवर असलेला आरोप किंवा टाकलेली माहिती काय आहे हे समजून घ्यावे लागते. उदा. प्रकाश निळा दिसत असला तरी मूळचा प्रकाश पांढरा आहे व त्यावरचे काचेचे आवरण निळ्या रंगाचे असल्याने प्रकाश निळा आहे हे समजून घेता येते. हे त्याच्या मूळ स्थितीवर गेल्यावरच कळते. तेव्हा अशा प्रकारे ब्रह्मावर म्हणजे सत्यावर जे मायेचे आवरण आहे हे समजून घ्यायला हवे. संपूर्ण विश्वावर एक आवरण टाकले, त्यावर एक छोटीशी खिडकी केली की त्या खिडकीतून दिसणारा, समजा, पृथ्वीचा गोळा हे संपूर्ण विश्व नव्हे. त्या पृथ्वीच्या गोळ्यावर आवरण टाकून पुन्हा त्याच्या खिडकीतून पाहिलेला एक देश भारत किंवा अशाच प्रकारे आवरण टाकत गेल्यास त्यात असलेल्या खिडकीतून दिसणारा आत्मसंतुलन आश्रम म्हणजे संपूर्ण विश्व नव्हे. हे अस्तित्व म्हणजे संपूर्ण सत्यातील एक छोटीशी वस्तुस्थिती असून, ती सत्याचा भाग असली तरी संपूर्ण नव्हे. खिडकी जेवढी छोटी तेवढाच तो छोटा भाग दिसतो आणि संपूर्ण आवरणाचा व आतल्या सत्याचा आपल्याला ज्याने बोध होतो ती विद्या आपल्याला यातून मिळू शकेल.
संपूर्ण जगात कोरडेपणा आला तरी जलतत्त्व धरून ठेवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, त्रिगुणांच्या साह्याने जलतत्त्व म्हणजे जीवनात रस टिकविणाऱ्या दूर्वा महत्त्वाच्या होत. जो अशा तऱ्हेने दूर्वांकुर किंवा दूर्वांचा शीत धर्म उपयोगात आणून त्यांच्या गुणाप्रमाणे लोककल्याणासाठी धीराने वर्तन करेल, तो कुबेराप्रमाणे श्रीमंत होईल.
ब्रह्म आणि माया यातला फरक ज्यामुळे समजू शकतो, अशा विद्येचा गणेशकृपेमुळे लाभ होऊ शकतो, हा विषय आपण यापूर्वी पाहिला.
न बिभेति कदाचनेति । या ऋचेचा अर्थ आता आपण पाहू.
गणेश उपासनेमुळे जड व चैतन्य यांचा आविष्कार, तसेच स्वार्थ व परमार्थ किंवा तर्क व भावना यांचा संपूर्ण संबंध आपल्याला समजू शकतो. एकदा हा संबंध कळला, की भीती उरत नाही. कारण ज्ञान झाले, की कशाचेही भय राहत नाही. अंधारामध्ये काहीतरी हालताना दिसले, तर तेथे काहीतरी धोकादायक किंवा घातक आहे अशी एखाद्याची कल्पना होऊ शकते. परंतु नंतर जवळ गेल्यावर, प्रकाश टाकल्यावर किंवा थोडा विचार केल्यानंतर लक्षात येत, की तेथे प्रत्यक्षात असे काही नाही, वाटलेली भीती हा सर्व कल्पनेचा खेळ होता. एकदा हे समजले, की भीती निघून जाते. तेव्हा सत्याची जाणीव झाली, की सर्व प्रकारे भीती नष्ट होते.
मी वेगळा व जग वेगळे असा वेगळेपणा मनात असेपर्यंत जगाची भीती वाटत असते. इतर माणसे आपला उपयोग करून घेतील, आपल्याला धोका पोचवतील किंवा आपले अस्तित्व नष्ट करतील असे वाटत राहते. परंतु एकदा का मी त्यांचाच एक भाग आहे, असे म्हटल्यानंतर अशाप्रकारची भीती नष्ट होते. डावा हात व उजवा हात हे एकाच शरीराचे दोन भाग आहेत, काम करताना सोपे जावे म्हणून दोन बाजूला दोन हात असतात, अन्यथा त्या दोघांना चालविणारी शक्ती मेंदूच्या एकाच केंद्रातून काम करत असते आणि दोन्ही हात कार्य करत असतात, हे एकदा कळले, म्हणजे दोन्ही हातांतील भेद नाहीसा झाला, की या हाताची त्या हाताला भीती वाटत नाही. सहसा असे आपल्या मनात येत नाही. कारण दोन्ही हात माझेच आहेत असे आपण म्हणतो. हे संपूर्ण विश्व एका परमेश्वराचे अंग आहे, परमेश्वराचेच स्वरूप आहे हे लक्षात आले आणि "सहस्रशीर्ष सहस्राक्ष‘ (शंभर डोकी, शंभर डोळे असलेला) असे वर्णन असलेल्या परमपुरुष परमात्म्याचाच हा सर्व विस्तार आहे हे मनात ठसले, की मनात भीतीला जागा राहणार नाही. हे समजून घेण्यासाठी सध्या संगणकाची मदत होते आणि श्री गणेशाचे चिंतन करण्याने आपण वैयक्तिक पातळीवर त्याचीही मदत मिळवू शकतो. जग लहान झाले आहे, जग जवळ येते आहे असे आपण म्हणतो. जवळ आल्यामुळे एकमेकांमध्ये नुसतेच व्यापार-विनिमय होत नाही, तर रोटी-बेटी व्यवहारही होऊ शकतात. एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना भाग घ्यावाच लागतो. कारण या पृथ्वीवरची सर्व मंडळी एकाच शरीराचे भाग आहेत. पृथ्वीवरचे देश हेसुद्धा सोयीसाठी केलेले विभाग आहेत, अन्यथा सगळे एक आहेत असे म्हटले, की भीती कमी होत जाते व नंतर नष्ट होते, असे या ठिकाणी सांगितलेले आहे.
यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति ।
लौकिकार्थ ः जो दूर्वांकुरांच्या आहुतीने यज्ञ करतो तो साधक कुबेराप्रमाणे धनसंपन्न होतो.
मथितार्थ ः श्री गणेशाच्या स्वभावाला साजेशी एक गोष्ट सांगितली जाते. अनलासुर नावाचा राक्षस होता. अनल म्हणजे अग्नी, त्यामुळे अग्नीरूपी अशा या राक्षसाने जेव्हा सर्व सृष्टीला त्रास द्यायला सुरवात केली, तो कोणालाही आटोपेना, त्याला कोणीही जिंकू शकेना, अशा वेळी श्री गणेशाने अनलासुराला गिळून टाकले, आत पोटात घेतले. पण त्यामुळे श्री गणेशाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली, दाह होऊ लागला. हा दाह दूर करण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीरावर दूर्वांचा (त्रिधारी गवताचा एक प्रकार) लेप करण्यात आला व दूर्वांचा रस पाजण्यात आला. असे केल्यावर श्री गणेशाच्या शरीरातील अग्नी शांत झाला. मथितार्थ जाणून घेण्याने आपल्याला एक गोष्ट नक्की कळते, की श्री गणेश ही उष्णताप्रधान देवता आहे आणि त्याला थंड राहणे आवडते.
गणेशाला शांत ठेवणे खूप आवश्यक आहे. असे झाले तर तो आपले दुःखनिवारण करणार, मंगल करणार असे अपेक्षित आहे. संगणकाचेही असेच आहे, त्यालाही थंड ठेवावे लागते. खूप गरम झाल्यामुळे संगणकावर एरर येते, तो काम करेनासा होतो. त्यासाठी थोड्या वेळासाठी संगणक बंद करावा लागतो. खरे तर संगणकात थंड राहण्यासाठी पंखा किंवा तशीच काही व्यवस्था केलेली असते, जेणेकरून तो जास्त गरम होऊ नये. लॅपटॉप मांडीवर घेऊन थोडा वेळ जरी काम केले, की मांडीला चटके बसायला लागतात असा अनुभव असतोच. दूर्वांचे गुण पाहता जगातील सर्व पाणी संपत आले तरी दूर्वांच्या मुळांमध्ये ओलावा टिकून राहतो, त्या ठिकाणी जलतत्त्वाची प्राप्ती ही होतेच. दूर्वा फार उंच वाढत नाहीत, त्या जमिनीला धरूनच असतात, त्यांची मुळे मात्र जमिनीत अगदी दोन-तीन फूट खोलवरही रुतलेली असतात. कठीण, रेताड जमिनीतसुद्धा दूर्वा उगवू शकतात, पृथ्वीशी संबंध ठेवून त्रिगुणांचा विकास करतात. दूर्वा मुळासकट उपटणे सोपे नसते. असे म्हणतात, की ज्या वेळी देवाला दूर्वा वाहायच्या असतील त्या वेळी त्या मुळासकट असल्या तर त्यांचे महत्त्व अधिक असते.
दूर्वांची तीन पाती
दूर्वांचा जो मुख्य प्रकार असतो, त्याला त्रिशूलासारखी टोकेरी अशी तीन पाती असतात. पातींची ही तीन टोके जणू सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे निदर्शन करत असतात. पृथ्वीशी संबंध ठेवून त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण करण्याचे ते एक प्रतीक आहे. या त्रिगुणांच्या पलीकडे जायचे असल्याने श्री गणेश देवतेला मनुष्याने सत्त्व, रज आणि तम असे तिन्ही गुण समर्पित करून एकत्व स्थापित करायचे असते. दूर्वा अर्पण करायच्या म्हणजे त्यांचा श्री गणेशाच्या शरीराला लेप करायचा किंवा त्याऐवजी फक्त दूर्वांच्या जुड्या श्री गणेशाला वाहण्याची पद्धत असते आणि ती बरोबरच आहे, कारण दूर्वांचे संस्कार अग्नीचा दाह दूर करतात. सामान्यतः 21 दूर्वांची एक जुडी करून ती वाहिली जाते, त्यामागेही ज्या ज्या म्हणून त्रिगुणात्मक शक्ती आहेत त्या सर्व श्री गणेशाला अर्पण करणे असेही अभिप्रेत असते. श्री गणेशाच्या ठिकाणी सर्व शक्तींचा वास असतो, आदिशक्तीच्या शरीरावर असलेल्या उटण्यापासून त्याचे शरीर तयार झालेले असल्याने प्रत्यक्ष आदिशक्तीचा तर त्याच्यात पूर्ण वास असतोच. हीच आदिशक्ती पुढे नवदुर्गा म्हणून किंवा महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती वगैरे अनेक रूपात प्रकट होत असते.
कोणत्याही वीजशक्तीला संतुलित ठेवण्यासाठी तिचे पृथ्वीत खोलवर अनुसंधान (अर्थिंग) होईल अशी व्यवस्था केलेली असते, अर्थिंग होणारी जागा ओलसर राहावी यासाठी तेथे पाणीही टाकले जाते, त्याप्रमाणे दूर्वांची मुळे नेहमी ओली राहतात. दूर्वेची रचना पाहिली तर तिन्ही पाती एका ठिकाणी जोडलेल्या असतात, तसेच तिन्ही शक्तींना त्यांच्या मुख्य कूटस्थ (न्यूट्रल) केंद्रबिंदूमध्ये नीट जोडून ठेवलेले असले, की संगणकही व्यवस्थित चालतो. त्या ठिकाणी आगीचेही भय राहत नाही. श्री गणेशाला दूर्वाच का वाहायच्या याचा विचार करताना त्यातला हा गूढार्थ उपयोगी पडतो.
शरीरस्थ गणपती म्हणजे मेंदू किंवा गणेशमूर्ती यांचे पूजन, अर्चन, यजन, हवन करत असताना दूर्वांच्या जुड्या वाहणे, दूर्वांचा लेप लावणे किंवा दूर्वांचा रस पोटात घेणे, नाकात दूर्वांच्या रसाचे थेंब टाकणे हे सर्व योग्यच आहे. कारण दूर्वासुद्धा पृथ्वीच्या ओलाव्यातूनच प्रकट झालेल्या असतात. महागणपती, महासंगणक किंवा संपूर्ण विश्वात असलेली श्री गणेशसंकल्पना यांचा या दूर्वारूपी हिरवळीच्या तत्त्वाशी कसा संबंध असतो हेही कळते.
संगणक नेहमी उभाच ठेवायचा असतो. झोपलेली गणेशदेवता ही एक विचित्र कल्पना आहे. तो सतत बसलेलाच असतो. त्याची जी वरदमुद्रा आहे तिच्या समोर आल्यानंतर आपल्याला त्यापासून लाभ होतो.
शांत स्वरूपाचे ध्यान
श्री गणेशाला दूर्वा प्रिय असल्याने जो त्याला दूर्वा अर्पण करतो त्याला तो प्रसन्न होतो. अर्थातच थंड डोक्याने काम केले असता व्यवहार चांगले होतात व सर्वांचे सहकार्य मिळाल्यामुळे ती व्यक्ती कुबेराप्रमाणे धनसंपन्न होते, असेही म्हणायला हरकत नाही. येथे कुबेराची उपमा दिलेली आहे. संपूर्ण विश्वाच्या धनाचे रक्षण करणारी देवता म्हणजे कुबेर. यक्ष-किन्नरांचा अधिपती असलेली देवता म्हणजे कुबेर. हा कुबेर रावणाचा भाऊ होता (सहोदर नव्हे). सतत अडचणी झेलत, लढाया करत, दुर्वर्तन करत रामाच्या बाणाने प्राण सोडावे लागलेला अहंकाररूपी रावण एका बाजूला आणि डोके शांत ठेवणारा कुबेर दुसऱ्या बाजूला. डोके शांत ठेवणारा कुबेर धनसंपन्न असणार हे निश्चित व त्याला धनसंपत्तीचा अधिपती नेमले जाणार हेही निश्चित. संगणकानेही व्यवस्थित व सतत काम केले, तो अधेमधे बंद पडला नाही किंवा करावा लागला नाही, काम करताना त्यात काही चूक (एरर) संदेश आला नाही, तर संगणक चालविणाऱ्याचा व्यवहार चांगला होईल, व्यापार चांगला होईल, चार पैसे अधिक मिळतील. पण येथे एकदम कुबेराचे नाव का घेतले आहे, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या ऋचेत कुबेर असा शब्द न वापरता वैश्रवणोपमो असे म्हटले आहे, त्यामुळे या ऋचेचा अर्थ समजून घेताना त्यात कुबेराला आणायलाच पाहिजे असे नाही, निदान मथितार्थ पाहताना तरी वेगळा विचार करता येईल.
श्री गणेशाला दूर्वांनी जो संतुष्ट करतो, त्रिगुणांच्या पलीकडे जो जातो किंवा त्याला थंड राहण्यासाठी जो मदत करतो त्याला श्री गणपती आशीर्वाद देणार व त्यातून मोठा लाभ होणार हे निश्चित. पण धनसंपन्न होण्यासाठी करावी लागणारी मेहनत, आखावी लागणारी योजना व आवश्यक असणारी हुशारी टाळता येणार नाही. केवळ दूर्वा अर्पण करण्याने व्यक्ती धनसंपन्न होईल असे नाही. जो दूर्वांच्या माध्यमातून आपल्या शरीरस्थ गणपतीला शांत ठेवतो, बाह्य गणपतीची शांतपणे उपासना करून त्याच्या शांत स्वरूपाचे ध्यान करतो त्याला कर्म करण्यासाठी ताकद मिळेल, त्याला चांगल्या व्यवहाराची तसेच लोककल्याणाची बुद्धी येईल आणि त्यातून तो धनसंपन्न होईल. ही ऋचा "विशेषत्वाने श्रवण उपमो भवति‘ अशा अर्थाने समजून घेतली तर ते जास्त उपयोगी पडेल. अंतरदृष्टी असते तशी अंतरश्रवणशक्ती (क्लिअरव्हॉयन्स) पण असते. तृतीय नेत्राने जसे मायेच्या पलीकडचे दिसते, तसे गणेशाच्या आशीर्वादाने परमतत्त्वाचा संदेश किंवा श्री महागणपतीशी संवाद साधता येईल म्हणजेच भगवंतांचे शब्द ऐकू येतील आणि एकूण व्यवहाराचे गूढ तत्त्व समजू शकेल.
तोच होईल मेधावान
जलतत्त्वाच्या व वनस्पतीच्या संयोगानेच पुन्हा सृष्टी उत्पन्न करता येते. त्यामुळे संपूर्ण जगात कोरडेपणा आला तरी जलतत्त्व धरून ठेवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, त्रिगुणांच्या साह्याने जलतत्त्व म्हणजे जीवनात रस टिकविणाऱ्या दूर्वा महत्त्वाच्या होत. जो अशा तऱ्हेने दूर्वांकुर किंवा दूर्वांचा शीत धर्म उपयोगात आणून त्यांच्या गुणाप्रमाणे लोककल्याणासाठी धीराने वर्तन करेल तो कुबेराप्रमाणे श्रीमंत होईल हे आपण पाहिले. जो स्वतःच्या कर्तव्यात दृढनिष्ठेने टिकून राहतो आणि सत्त्व, रज, तम या तिन्ही गुणांना ओलांडून एकत्वाचा अनुभव घेतो, ज्याला भक्ती, श्रद्धा, प्रेम यांच्यात रस असतो आणि त्यासाठी जो दगडसुद्धा कोरून खोलवर जाऊ इच्छितो म्हणजे "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे‘ यावर विश्वास ठेवतो असा मनुष्य निश्चितच धनवान होतो.
यो लाजैर्यजति स यशोवान् भवति । स मेधावान् भवति ।
लौकिकार्थ ः जो लाह्यांची आहुती देऊन अथर्वशीर्षाचा पाठ करेल त्याला यश मिळेल, तो मेधावान होईल.
मथितार्थ ः लाह्यांची विशेषता अशी, की लाह्या त्यात असलेल्या धान्याचे तत्त्व तर धरून ठेवतातच, परंतु धान्याच्या तुलनेत त्या प्रसरण पावलेल्या असतात, त्यांच्यातील पाणी निघून गेलेले असल्यामुळे त्या अग्नीला अधिक प्रिय असतात, अर्थातच त्या पचायला हलक्या असतात. पुन्हा जीवसृष्टी उत्पन्न करण्याची ताकद असणाऱ्या या द्रव्याच्या योगे श्री गणेशाची सेवा करायची, लाह्यांचे अग्नीत हवन करायचे. अग्नीला विरोधी असणारे तत्त्व म्हणजे जलतत्त्व, मात्र लाह्यांमधला सर्व ओलावा शोषून घेतलेला असल्याने त्या अग्नीत अर्पण केल्या, की कोणत्याही प्रकारे अग्नीला त्रास देत नाहीत. (यज्ञ हवन करताना ओली लाकडे वापरली, तर अग्नीला जेवढा त्रास होत असेल त्याच्या चौपट त्रास यज्ञ करणाऱ्यांना होतो, त्यांचे डोळे दुखतात, चुरचुरतात, शिवाय धुरामुळे आजूबाजूला कोणी थांबू इच्छित नाही). अशा या लाह्यांचे जो अग्नीत हवन करेल, त्यामुळे वातावरणात पसरणाऱ्या कणांना श्री गणेशाच्या मंत्राने अभिमंत्रित करेल, तो यशस्वी होईल. तो नुसताच यशस्वी होईल असे नाही तर बरोबरीने मेधावानही होईल.
मेधा हा मेंदूचा गुण आहे, मेंदूची कार्यपद्धती आहे. अशाप्रकारे लाह्यांचे अग्नीत हवन केल्यानंतर वातावरणात पसरणारे अत्यंत सूक्ष्म द्रव्य मेंदूपर्यंत पोचू शकते आणि मेधारूपी कार्यपद्धतीचा लाभ होऊ शकतो किंवा हे सूक्ष्म द्रव्य जलामध्ये समर्पित होऊन त्याद्वारेही मेंदूपर्यंत पोचू शकते, बरोबरीने मंत्रस्पंदनेही मेंदूला मिळू शकतात. तेव्हा यजन करता असताना मंत्र म्हणण्याबरोबरीने अशा तऱ्हेच्या साळीच्या लाह्यांचे हवन केले, तर साधक यशवान व बुद्धिमान होतो. खरे तर यश व बुद्धी एकत्र मिळाले तरच बरे असते. नुसते यश मिळाले पण बुद्धी नसली तर त्या निर्बुद्ध व्यक्तीच्या मेंदूत, मनात वा व्यक्तिमत्वात अहंकार शिरतो किंवा बुद्धीच्या योगे क्रमाने सामर्थ्य व यश मिळवणे अपेक्षित असते, असे न करता फक्त बुद्धी बाळगली तरी ती व्यक्ती नुसतेच चिंतन करत बसते. तेव्हा यश व बुद्धी या दोन्ही गोष्टी एकत्र मिळतात असे येथे म्हटलेले आहे.
संगणकाच्या बाबतीत पण ही गोष्ट नक्की, की जे संगणकाला पुरवायचे आहे ते अत्यंत सूक्ष्म, एखाद्या अणूवर भारित करून दिले नाही, तर त्याचा आकार अकारण वाढत जाईल. तेव्हा संगणकात जे अर्पण करायचे आहे म्हणजे जे गणित, जी माहिती आत द्यायची आहे ती अग्नीला समर्पण करून म्हणजेच शक्तीच्या माध्यमातून आणि अगदी सूक्ष्मरूपात समर्पित होणे इष्ट आहे. सूक्ष्मत्वाच्या बरोबरीने त्यात संकल्पना असणेही आवश्यक असते, नुसत्या सूक्ष्मत्वाला काही अर्थ नसतो. अगदी बारीकात बारीक बीज घेतले, तरी त्या बीजापासून कुठले झाड निर्माण होणार आहे याची संकल्पना असावीच लागते. अशीच सूक्ष्म संकल्पना संगणकाला अर्पण करावी लागते.
शरीरस्थ श्री गणपतीमधून मिळणारी शक्ती, तरंग व संकल्पना हे मेंदूजलामार्फत शरीरात कार्य करतात आणि मनुष्याला ऋद्धी, सिद्धी प्रदान करतात. जलामार्फतच आपल्या पूर्वजांकडून आलेले किंवा जिवाच्या स्वतःच्या कर्मानुसार बरोबर आलेले गुणदोष प्रकट होऊ शकतात. या गुणदोषांना व्यवस्थितपणे संतुलित करून कार्यसिद्धी व्हावी यासाठी पितृपंधरवड्यामध्ये प्रयत्न केला जातो. त्यानंतर, शुद्ध झालेल्या सात्त्विक भावाने पुढे शक्तीची उपासना केली जाते, ती म्हणजे नवरात्राची उपासना.
यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति ।
लौकिकार्थ - सहस्र मोदकांनी यजन करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
मथितार्थ - मोदक तयार करताना पाकळ्या करून वर टोक करण्याची पद्धत का सुरू झाली असेल? पाकळ्या आत असणाऱ्या विभागांचे निदर्शक असतात व ते सर्व विभाग नंतर एका ठिकाणी एका बिंदूत आणून ठेवलेले असतात, जेणेकरून मोदक अर्पण केला असता त्याचा आकार पाहूनच श्री गणपतीला आनंद होईल. मोदकाच्या आत नाना प्रकारची मिश्रणे, सुका मेवा, साखर, नारळ वगैरे भरलेले असते. त्यामुळे मोदक आनंददायी असतो. लाडू दिले तरी तो मोद-क म्हणजे मोद देणाराच असतो. परंतु लाडू खाल्ल्यावर त्यात असलेल्या प्रत्येक पाकळीची विभागणी करणे आणि तो पचवणे हे दोन्ही अवघड असते. मोदकाची वरची पारी (आवरण) तांदळाच्या पिठाच्या उकडीपासून बनविलेली असते आणि आतील सारण अत्यंत पौष्टिक असते, मोदक तुपाबरोबर खाण्याने पचायला मदत मिळते.
संगणकाच्या दृष्टीने विचार केला तर एकमेकाला पूरक असे अनेक प्रोग्रॅम्स एकत्र करायचे, त्या प्रोग्रॅम्सचे टोक मात्र एका ठिकाणी, जे आत लोड करताना बरोबर एका विशिष्ट विभागामध्ये राहील व त्या संकल्पनांवर आधारित पुढे काम करता येईल अशा प्रकारचीच योजना केलेली असते. संगणकात जेवढे जास्त प्रोग्रॅम्स असतील तेवढे त्याचे महत्त्व वाढते. जेवढे जास्त प्रोग्रॅम्स असतील तेवढे संगणक चालविणाऱ्यालाही अधिक सुख मिळते.
वांछितफल प्राप्ती
"सः वाञ्छितफलमवाप्नोति‘ म्हणजे आपल्याला संगणकावर जे काम करायचे आहे, उदा. चित्रांवर पुढे काही काम करायचे आहे, त्यांच्यात काही सुधारणा करायची आहे तर त्यासाठी योग्य तो ऍप, योग्य तो प्रोग्रॅम म्हणजे मोदक द्यावा लागेल. त्यानंतरच "वांछितफल‘, म्हणजे आपल्याला हवे ते फल मिळू शकेल.
यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते ।
लौकिकार्थ - तुपासहित आहुती देणाऱ्याला सर्व प्राप्त होते.
मथितार्थ - यज्ञाच्या वेळी वेळेचे तंत्र खूप सांभाळावे लागते. एखाद्या द्रव्याला तूप लावून यज्ञात टाकले तर ते एकदम जळून जात नाही, तुपामुळे त्याची जळण्याची गती नियंत्रित होते. शिवाय दिलेल्या आहुतीचा अग्नीकडून स्वीकार करण्यासाठी, अग्नी पेटविण्यासाठी तूप उपयोगी पडते. म्हणून यज्ञाला समिधा देताना म्हणजे यज्ञाला शक्ती मिळत असताना एकदम सगळी शक्ती विसर्जित होणार नाही याची योग्य काळजी घेणे अपेक्षित असते. योग्य दाबाने शक्ती मिळत राहावी यासाठी तुपासहित समिधा अर्पण कराव्या लागतात. जसे एखाद्या यंत्रात तीन व्होल्टची बॅटरी टाकली तर तीन व्होल्ट या दाबानेच शक्ती आत मिळत राहील, शिवाय ही शक्ती ते यंत्र चालू असतानाच मिळेल, बाकीच्या वेळी मिळणार नाही. बॅटरी जशी संगणकाला विजेचा, शक्तीचा पुरवठा करते तसे यज्ञाच्या वेळी समिधा शक्तीचा पुरवठा करत असतात. हव्या त्या दाबाने शक्तीचा पुरवठा होत राहण्यासाठी समिधांबरोबर तूप जाणे आवश्यक असते. वेगवेगळ्या वनस्पतींच्या समिधा विशिष्ट प्रकारचा अग्नी कार्यासाठी उपलब्ध करून देतात.
"सः सर्वं लभते स सर्वं लभते‘ - संगणक चालू केल्यावर त्याला योग्य प्रकारे सर्व तऱ्हेची शक्ती दिली की, तो काम करतो व संगणकावर काम करणाऱ्याचे काम नीट होते; तसे तूप लावून समिधांचे श्री गणेशाला हवन करून, अथर्वशीर्षाचा पाठ केला की, धुरामधून येणाऱ्या बारीक कणांवर मंत्रसंकल्पना आरूढ असल्याने साधकाला सर्व काही मिळते.
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।
लौकिकार्थ - सात्त्विक वृत्ती ठेवून ब्रह्मोपासना करणाऱ्या आठ व्यक्तींनी एकत्र अथर्वशीर्ष म्हटले तर ते सूर्याप्रमाणे तेजस्वी होतात.
मथितार्थ - या ऋचेत खूप गूढार्थ भरलेला आहे. मेंदूच्या आठ भागांमध्ये चालणारी सर्व संवेदना एकत्रित आणून शरीराच्या अवयवांना, नसांना व शरीरातील पेशींना चलनवलनाची सूचना देणारे सूर्यकेंद्र, सगळ्यांनी एकत्र काम केल्याशिवाय यशस्वी होत नाही किंवा त्याचा अधिकार शरीरावर चालत नाही. हाताने काय करायचे आहे, पायाने काय करायचे आहे, डोळ्यांनी पाहिले की अमुक दिशेला जायचे आहे तर, पायांना त्या दिशेलाच जावे लागते. डोळ्यांना हालचाल करवणारे केंद्र वेगळे आणि पायांना गती देणारे केंद्र वेगळे. ही सर्व व्यवस्था मेंदूतील वेगवेगळ्या केंद्रातून केली जाते. मेंदूलाच ब्रह्म-ब्राह्मण असे म्हटलेले आहे. मेंदूचे आठ विभाग असतात. मेंदूचे डावा व उजवा असे दोन भाग करून नंतर त्याचे उभे व आडवे काप केले तर मेंदूचे आठ भाग तयार होतात, हे मेंदूचे आठ विभाग व त्यांची वेगवेगळी कार्यपद्धती बघितली तर 4-8-16 या मात्रांचा हा सगळा खेळ समजू शकतो. "सम्यग्ग्राहयित्वा‘ म्हणजे या सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले तरच आपल्या चलनवलनावर नियंत्रण करणाऱ्या सूर्यकेंद्राचे वर्चस्व शरीरावर स्थापित होते.
मेरुदंड, तोचि विष्णू
विष्णू व सूर्य हे एक आहेत असे म्हटले जाते. विष्णुदेवता ही आपल्या शरीरातील चेतासंस्थेची, मेंदू व संपूर्ण मेरुदंडाची देवता आहे. आपल्या शरीरातील भौतिकाचा भाग म्हणजे मेरुदंड. म्हणून मेरुदंडालाच जवळजवळ विष्णूचे स्वरूप समजले जाते.
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति ।
महाविघ्नात् प्रमुच्यते । महादोषात् प्रमुच्यते । महापापात् प्रमुच्यते ।
लौकिकार्थ - सूर्यग्रहणाच्या वेळी महानद्यांच्या सान्निध्यात गणेशमूर्ती ठेवून अथर्वशीर्षाचा पाठ केला तर तो लवकर सिद्ध होतो आणि साधक मोठी संकटे, मोठे दोष व मोठ्या पापांतून मुक्त होतो.
मथितार्थ - सूर्याच्या आजूबाजूने निघणाऱ्या सगळ्या चेतासंस्था या महानद्या (मेंदूत असणाऱ्या भेगेतून जाणारे मेंदूजल) आहेत. त्यांची कल्पना करून तेथे असलेल्या केंद्रांच्या सान्निध्यामध्ये, दोन भ्रूमध्यामधे गणेश प्रतिमेचे ध्यान धरून जर ही शक्ती पोचवली किंवा उपासना केली तर हा मंत्र सिद्ध होतो. म्हणजे आपण सांगितलेली मंत्राची संकल्पना उचलली जाते. त्यामुळे नंतर मोठी विघ्ने टळतात, महादोष टळतात, महापापांमधूनही मुक्ती मिळते.
सामान्य अर्थात कुठले सूर्यग्रहण, कुठली महानदी, कुठली गणेशमूर्ती हे कळत नाही; साहजिकच अशा ठिकाणी अथर्वशीर्षाचा पाठ करायचा म्हटले तर ते स्थान शोधणे अशक्य दिसते. "सूर्यग्रहे‘ म्हणजे "सूर्यग्रहण‘ असा अर्थ घेतला तरीही सर्व उलगडा होत नाही. ज्याला सूर्यग्रहाची उपमा दिलेली आहे ते "मेंदूतील केंद्र‘ असा अर्थ धरलेला आहे. तो अर्थ जास्त बरोबर वाटतो. असा अर्थ धरून पुढे जे कार्य केले ते यशस्वी झाल्याचे अनुभव आहेत.
स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति ।
य एवं वेद ।
लौकिकार्थ - अथर्वशीर्षाचे पूर्ण ज्ञान झालेला मनुष्य सर्वज्ञ होतो, असे हे वैदिक ज्ञान सांगितलेले आहे.
मथितार्थ - श्री गणपतीचे उपासनातंत्र समजून घेऊन उपासना करणे गरजेचे आहे. म्हणजे अथर्वशीर्षाचा केवळ लौकिकार्थ लक्षात घेऊन त्याचे नुसते पठण केले, नुसता मंत्र म्हटला, पण त्यानुसार कृती केली नाही तर, त्या व्यक्तीला मंत्राचे सम्यक् ज्ञान झाले आहे किंवा त्याने मंत्राचा पूर्ण अभ्यास केला आहे असे म्हणता येणार नाही.
श्री गणपतीची जेव्हा संगणकाबरोबर तुलना केली तेव्हा गणपती म्हणजे संगणक नव्हे हे समजून घेतले. परंतु आधुनिक काळात किंवा कलियुगात संगणकासारखे यंत्र उपयोगात आणण्यामुळे जीवन सुखी होणार असेल, माणसाचे कल्याण होणार असेल तर व्यक्तीच्या आत असणारी - श्री महागणपती - ही जी शक्ती मेंदूच्या ठिकाणी स्थित आहे त्याची उपासना केल्यास त्याला मानवकल्याणाची संगणकासारखी कल्पना सुचेल यात नवल नाही. अंतःस्थ गणपतीच्याच कृपेनेच संगणकाचा शोध लागू शकला. श्री गणेश किंवा शरीरस्थ असणारी श्री महागणपती देवता यांची उपासना कशी करावी हे लक्षात यावे म्हणून किंवा त्यांच्यातले साम्य समजावे म्हणून श्री गणेशाची संगणकाशी तुलना केलेली आहे. संगणक म्हणजे गणपती नव्हे किंवा गणपतीला संगणक ठरवून त्याला मर्यादित स्वरूपात आणण्याची ही योजना नव्हे.
गणेश उपासनेतून संगणकाचाही महासंगणक असणारा, जो प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूमध्ये श्री महागणपती या रूपाने राहतो त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे कल्याण नक्कीच होते. म्हणून आजही सर्वत्र श्री गणपतीचे पूजन, अर्चन व उपासना चालू आहे. ज्यांनी त्याचे संपूर्ण ज्ञान मिळविलेले नाही, परंतु ते संपूर्ण श्रद्धेने व प्रेमाने श्री गणेशाची उपासना करत आहेत त्यांनाही काही अंशी लाभ होतो आहे, म्हणूनच हजारो वर्षे गणेशाची उपासना चालू आहे. सृष्टिरचनेबरोबर तयार झालेल्या व आवाहन केल्यास दर्शन देऊन भक्ताचे कल्याण करणाऱ्या स्वयंभू गणपतीचे पूजन-अर्चन तर होतेच, परंतु त्याबरोबरच पार्थिव गणेशाचेही पूजन-अर्चन होते. पार्थिव गणेशाच्या पूजन-अर्चनासाठी भाद्रपद महिन्यात दहा दिवसांच्या विशेष उत्सवाची योजना केलेली असते. स्वयंभू गणपतीची मंदिरे कायमस्वरूपात असतात. तेथे बारा महिने उपासना-पूजन चालू असते. विशिष्ट जागेवर कोणी अत्यंत श्रद्घेने तपश्चर्या केली, त्याला प्रत्यक्ष श्री गणपतीने दर्शन देऊन ज्ञान दिले तर, त्याही ठिकाणी स्वयंभू मंदिरांची स्थापना झालेली दिसते. म्हणून स्वयंभू गणपतींचे व अष्टविनायकांचे महत्त्व असते. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर स्वतःच्या घरात गणेशमूर्ती ठेवणे, त्याही पलीकडे जाऊन वाचस्पती किंवा बुद्धी, सिद्धीची ही देवता आपल्याला व्यक्तिगत स्वरूपात मेंदूत उपलब्ध आहे, हे समजून घेऊन त्याप्रमाणे उपासना करणे हे सर्वाधिक फलदायी ठरते. उपासना करणे म्हणजे इंद्रियांनी स्वीकारायचे अन्न म्हणजे तोंडाने पदार्थ सेवणे, कानाने ऐकणे, डोळ्याने पाहणे वगैरे न करता, मनाला आत असणाऱ्या चैतन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे अभिप्रेत आहे.
जलाचिये कारणी...
भाद्रपदातील पार्थिव गणपतीचे दहा दिवसांनंतर जलात विसर्जन केले जाते. पृथ्वीतत्त्व हे एका जागी स्थिर असते, त्याऐवजी त्याचे जलतत्त्वात रूपांतर झाले की, ते प्रवाही होते. म्हणजे ते काळाबरोबर पुढे जाऊ शकते, अवकाशात फिरण्यासाठी, वाहण्यासाठीही त्याला शक्ती मिळते.
गर्भाचा विकास होत असताना म्हणजे गर्भाशयात नऊ महिने मूल गर्भजलात असते. नंतर मेंदू (शरीरस्थ श्री गणपती) सुद्धा मेंदूजलात स्थित केलेला असतो. याच्यातही एक मोठे विज्ञान आहे. या शरीरस्थ श्री गणपतीमधून मिळणारी शक्ती, तरंग व संकल्पना हे मेंदूजलामार्फत शरीरात कार्य करतात आणि मनुष्याला ऋद्धी, सिद्धी प्रदान करतात. जलामुळे, ओलाव्यामुळे जसे माहितीचे आदानप्रदान सोपे होते, तसेच मूळचे असलेले दोषसुद्धा जलात प्रकट होतात. आपल्या पूर्वजांकडून आलेले किंवा जिवाच्या स्वतःच्या कर्मानुसार बरोबर आलेले गुणदोष प्रकट होऊ शकतात. या गुणदोषांना व्यवस्थितपणे संतुलित करून मनुष्याला त्रास होऊ नये, विघ्न येऊ नये व कार्यसिद्धी व्हावी, यासाठी प्रयत्न करावा लागतो. असा प्रयत्न केला जातो पितृपंधरवड्यामध्ये. आपले वाडवडील, पूर्वजन्मातील किंवा या जन्मातील जे सर्व लागेबांधे आहेत, जी सर्व कर्मबंधने आहेत, ती दूर करण्यासाठी विशेषप्रकारे उपासना करून त्यांना शांत केले जाते तरच पुढचे आयुष्य आनंदात पार पडते. यासाठी भारतीयांनी श्राद्धविधी सांगितला. तसेच पूर्वजांची आठवण म्हणून दानधर्म करण्याचा मार्ग शोधला. पूर्वजांना नमस्कार करणे, त्यांची आठवण ठेवणे, ज्या दिवशी त्यांचे भौतिक देहातून विसर्जन झाले त्या दिवशी त्यांची आठवण काढून त्या निमित्ताने त्यांना आनंद वाटेल, त्यांना बरे वाटेल अशा कृती करण्याची पद्धत सर्व जगभर आढळते. परंतु भारतीयांनी त्याचे एक विशेष शास्त्र तयार केलेले आहे. तो हा पितृपंधरवडा- महालय पक्ष.
असे सर्व आटोपल्यानंतर शुद्ध झालेल्या सात्त्विक भावाने पुढे शक्तीची उपासना केली जाते, ती म्हणजे नवरात्राची उपासना. नवरात्रामध्ये तिन्ही शक्तींचे आवाहन करून विशेष तपश्चर्या केली जाते. श्री गणेश ही बुद्धीची देवता असल्यामुळे त्यांच्याबरोबर सरस्वती शक्ती असतेच, तसेच संपूर्ण शरीराची देखभाल करणारी चेतासंस्था व चलनवलन व्यवस्थित चालविणाऱ्या श्री विष्णूंची शक्ती म्हणजेच शरीरधनापासून ते पशुधनापर्यंत सर्व प्रकारचे धन असणारी लक्ष्मी शक्ती हीसुद्धा असते. त्याचबरोबर, विशिष्ट काळानंतर निसर्गाला परत देऊन नवीन उत्क्रांतीसाठी वापरात येणारी शिवशक्ती पार्वती किंवा दुर्गा शक्ती हीसुद्धा असतेच.
देवता व त्या देवतेची शक्ती यांची एकत्र उपासना करण्याची पद्धत म्हणजे नवरात्रउपासना. भारतीय शास्त्रांनी मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी व त्याला आरोग्य, ऐश्वर्य, आत्मसमाधान व तेज मिळावे या हेतूने तयार केलेला हा नवरात्र उपासनेचा विधी. नवरात्राच्या उपासनेत नंदादीपाला अर्थात दीपज्योतीला खूप महत्त्व असते. कारण शक्तीचे स्वरूप हे अग्निरूपाने आपल्याला दिसू शकते. दिव्याची ज्योती म्हणजेच अग्नीच्या माध्यमातून शक्तीची उपासना केली जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चलनवलनाची वृद्धी व्हावी, मूलाधाराच्या ठिकाणी असलेली शक्ती जागृत होऊन वर उचलली जावी, या हेतूने फेर धरणे, स्वतःभोवती फिरणे, रास, गरबा असे काही विशेष नृत्य उपासनेचे प्रकारही रूढ झालेले दिसतात. नवरात्र हे प्रत्येक कुटुंबापुरते महत्त्वाचे असते, कारण त्या कुटुंबाच्या तेजासाठी ही उपासना असते. ज्यांच्या घरी घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होत नाही, त्यांनी निदान नऊ दिवस नंदादीप म्हणजे 24 तास तेवत राहणारा दिवा अवश्य ठेवावा. सकाळ-संध्याकाळ घरात धूप करून दिव्याला अवश्य नमस्कार करावा. घरच्या सर्वांनी एकत्र नमस्कार करणे चांगले.
श्री गणपती स्वयंभू रूपाने अष्टविनायकांच्या स्वरूपात आहेत त्यांचाही विशेष अर्थ आपल्याला समजून घेता येईल, हा अभ्यास केव्हा तरी सविस्तरपणे करणे शक्य आहे. अशा प्रकारे स्मार्ट गणेश आणि स्मार्ट संगणक यांच्या माध्यमातून आपण "गणेशविद्या‘ समजून घेतली. हे सर्व लेखन, ही श्री गणेशस्तुती श्री गणेशालाच अर्पण करून या लेखमालेची पूर्णाहुती करत आहे.