Wednesday, November 6, 2013

11:51 PM

Celebrity chef Tarla Dalal passes away


पद्मश्री तरला दलाल यांचे निधन Celebrity chef Tarla Dalal passes away

tarla-dalal

सेलिब्रिटी शेफ पद्मश्री तरला दलाल यांचे आज दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. तरला दलाल या गृहिणींच्या 'गाइड' म्हणून ओळखल्या जायच्या. पाककृतीवरील पुस्तकांची तर त्यांनी सेंच्युरीच मारली होती.

पाककलेत पारंगत असलेल्या तरला दलाल यांच्या रेसिपी देशभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या ठरल्या. त्यांचा टीव्हीवरील 'तरला दलाल शो' फारच गाजला. शाकाहारी पदार्थ बनवण्यात तर त्यांचा हातखंडाच होता. पाककलेतील उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दलाल यांनी १९६६ पासून मुंबईत कुकिंग क्लासेस सुरू केले. १९७४ मध्ये त्यांचं पहिलं कुकबुक प्रकाशित झालं आणि तेथूनच त्या तमाम गृहिणी आणि आचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून पुढे आल्या. त्यांचं हे पुस्तक फारचं गाजलं. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या तब्बल दीड लाख कॉपी विकल्या गेल्या. त्यांची शंभरावर पुस्तके प्रकाशित झाली असून ३० लाख एवढ्या विक्रमी प्रतींची विक्री झाली आहे.

सगळ्यात आधी ट्विटरवर तरला दलाल यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. त्यानंतर त्यांचं सकाळी निधन झाल्याचे त्यांच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले. त्यांनी जे आम्हाला भरभरून दिले आहे त्याची कधीही परतफेड होऊ शकणार नाही, अशा भावना त्यांच्या शिष्य वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्या.